Vande Bharat Express : नवीन वर्ष सुरू होण्यास अवघ्या दहा ते अकरा दिवसांचा काळ बाकी आहे. दरम्यान या येत्या नवीन वर्षात पुणेकरांना एक मोठी भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील नागरिकांसाठी नवीन वर्षात अर्थातच 2024 मध्ये तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जाणार आहेत.
सध्या पुण्याहून एकही थेट वंदे भारत एक्सप्रेस चालवली जात नाहीये. या चालू वर्षात सुरू झालेली मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस मात्र पुणे मार्गे धावत आहे. या गाडीचा पुणेकरांना फायदा मिळत आहे, मात्र थेट पुणे रेल्वे स्थानकावरून अजून एकही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही.
यामुळे थेट पुणे स्थानकावरूनही ही गाडी चालवली गेली पाहिजे अशी मागणी रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे.
अशातच येत्या नवीन वर्षात पुणेकरांना तब्बल तीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे सांगितले जात आहे. सध्या स्थितीला देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे काही मार्गांवर डबल वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. नवी दिल्ली ते वाराणसी हा देखील असाच एक मार्ग आहे. या मार्गावर सर्वप्रथम 2019 मध्ये पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली होती.
आता डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुन्हा या मार्गावर एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. विशेष म्हणजे मार्च 2024 पर्यंत 75 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्याचे नियोजन आहे.
या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीला अर्थातच पुणे शहराला तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत.
कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन सुरू होणार आहे. सध्या स्थितीला पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर शताब्दी एक्सप्रेस धावत आहे. मात्र ही एक्सप्रेस गाडी रद्द करून त्याऐवजी वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाईल अशी शक्यता आहे.
तसेच मध्ये रेल्वेच्या पुणे ते शेगाव या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस धावू शकते असा अंदाज आहे. असे झाल्यास शेगावला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय पुणे ते वडोदरा या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे. निश्चितच या तीन मार्गांवर जर ही गाडी सुरू झाली तर पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.