राज्य शासनाच्या १९ जून २०२३ रोजीच्या ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरणानुसार,
महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबवल्या जात आहेत.
या धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर १ ते ८ मार्च २०२४ हे ८ दिवस महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के इतकी सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी दिली.
पुढे महाजन म्हणाले, सर्व क्षेत्रांतील महिलांच्या अमूल्य योगदानाबद्दल कौतुक व्यक्त करण्यासाठी, एमटीडीसी आपल्या ‘आई’ उपक्रमाअंतर्गत ही सवलत जाहीर करत आहे.
या उपक्रमामुळे महिलांना पर्यटनासाठी वातावरण निर्मिती होऊन महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. महिलांसाठीच्या सवलतीचा लाभ पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरणाची राज्यात पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,
एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, तर एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल या धोरणाची कार्यवाही करीत आहेत.
■ एमटीडीसीची पर्यटक निवासे ही राज्याच्या कानकोपऱ्यात महत्त्वाच्या ठिकाणी वसलेली आहेत. महामंडळाची एकूण ३४ पर्यटन निवासे, २७ उपाहारगृहे असून, निवास व न्याहारी, महाभ्रमण, कलाग्राम, अभ्यागत केंद्र,
इको टुरिझम यांसारखे अनुभवात्मक उपक्रम आहेत. तसेच अलीकडेच जबाबदार पर्यटन अंतर्गत एमटीडीसीने मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरू केली आहे. त्याचप्रमाणे बीच रिसोर्ट, हिल रिसोर्ट, जंगल रिसोर्ट असे विविध पद्धतीचे पर्यटक निवास व उपाहारगृहे तसेच बोट क्लब, स्कूबा डायव्हिंग इ. जलक्रीडा केंद्र पर्यटकांना आकर्षित करत आहेत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.