Pune News : महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची पायाभरणी संत ज्ञानोबाराय यांनी केली. तर वारकरी संप्रदायाला कळस लावला आपल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराज यांचा जन्म 21 जानेवारी 1608 पुण्यातील देहू यां गावात झाला. बोल्होबा आणि कनकाई बोल्होबा आंबिले यांचे पुत्र तुकोबाराय यांना वयाच्या विसाव्या वर्षी देहू जवळ असलेल्या भांबनाथाच्या डोंगरावर साक्षात्कार झाला.
साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या वडिलांनी दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवलेत. तुकोबाराय हे जंगी श्रीमंत होते. त्यांचे वडील सावकार. पण साक्षात्कार झाल्यानंतर तुकोबारायांनी आपल्या वडिलांनी लोकांना दिलेले सर्व कर्ज माफ केले. तुकोबारायांनी भांबनाथाच्या डोंगरावर अर्थातच भंडाऱ्याचा डोंगरावर जवळपास पाच हजार अभंग लिहिलीत.
आता पुणे जिल्ह्यातील याच भंडाऱ्याच्या डोंगरावर वारकरी सांप्रदायाचे कळस जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर तयार केले जात आहे. हे मंदिर नागर शैलीत बांधले जात असून नागरशैलीतील महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर म्हणून तुकोबारायांचे हे भव्य मंदिर ओळखले जाईल.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवरायांचे गुरु हे तुकोबाराय. आज छत्रपतींचे गुरु तुकोबारायांचे भव्य-दिव्य असे मंदिर आपल्या भंडारा डोंगरावर विकसित होणार आहे. हे मंदिर गुजरात मधील जगप्रसिद्ध अक्षरधाम मंदिराच्या आधारावर तयार केले जात आहे. आतापर्यंत या मंदिराचे जवळपास 40% एवढे काम पूर्ण झाले आहे.
उर्वरित काम देखील जलद गतीने सुरू आहे. या मंदिरासाठी जवळपास 225 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे हा सारा खर्च भक्तांच्या आर्थिक सहाय्याच्या स्वरूपाने उभा केला जात आहे. मंदिर पंचवीस हजार स्क्वेअर फुट जागेत तयार केले जात आहे.
179 फूट लांब आणि 87 फूट उंच तसेच 193 फूट रुंदीचे हे मंदिर नागरशैलीत विकसित होत असून आत्तापर्यंत राज्यात नागरशैलीत एवढी मोठे मंदिर विकसित झालेले नाहीये. अर्थातच नागरशैलीतील हे राज्यातील सर्वात मोठे मंदिर ठरणार आहे. मंदिराचा कळस हा जवळपास 96 ते 97 फूट एवढा मोठा आकाराचा राहणार आहे. शिवाय मंदिराला सतरा छोटे कळस देखील बसवले जाणार आहेत.
मंदिराचा घुमट हा 34 फूट बाय 34 फूट आकाराचा राहणार आहे. मंदिरात पाच गर्भगृह राहतील. गर्भगृहाला पाच दरवाजे आणि सहा खिडक्या असतील. मंदिरातील मुख्य जागेवर विठ्ठल रुक्मिणीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तर समोरच्या बाजूला तुकोबारायांची मूर्ती राहणार आहे. विशेष म्हणजे भंडाराच्या डोंगरावरील ज्या झाडाखाली बसून तुकोबारायांनी गाथा लिहिली आहे तो नांदूरकी वृक्ष देखील मंदिराच्या बाहेरील भागात असणार आहे.
मंदिराची विशेषता अशी की हे 122 खांबांवर उभे राहणार आहे. याच्या बांधकामाला लोखंड न वापरता इंटरलॉकिंग सिस्टीम ने बांधकाम केले जात आहे. मंदिराचा स्लॅब हा दगडांमध्ये बनवणार आहे. हे मंदिर उभारण्याचे काम वास्तू विशारद परेश भाई सोमपुरा आणि चंद्रकांत सोमपुरा पाहत आहेत.
सोमपुरा यांनी आत्तापर्यंत गुजरात मधील सोमनाथ मंदिर, अक्षरधाम ग्रँड मेमोरियल, अयोध्येतील श्री राम मंदिर इत्यादी मंदिराची कामे केली आहेत. मंदिरा सोबतच भंडारा डोंगराच्या पायथ्याला भव्य स्वागत कमान उभारली जाणार आहे. सदेह वैकुंठाला जाणाऱ्या तुकोबारायांचे हे भव्य दिव्य मंदिर निश्चितच देहूच्या वैभवात मोठी भर घालणार आहे.