Maharashtra News : वाघ जेव्हा जंगलात असतो, तेव्हा तो राजा वाटतो. मात्र, हाच वाघ जेव्हा सर्कशीतील रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर कसरती करतो, त्या वेळी त्रास होतो.
अरे ज्या वाघावर मी जिवापाड प्रेम केलं, ज्याच्या डरकाळीने भल्याभल्यांचा थरकाप उडायचा, आज त्यालाच पिंजऱ्यात गुरगुरावं लागतंय.
दिल्लीच्या इशाऱ्यावर गप्प बसावे लागणाऱ्यांची कीव येते, अशी जहरी टीका खा. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता बारामतीत आक्रोश मोर्चाच्या सभेत केली.
शहरातील तीन हत्ती चौक येथे महाविकास आघाडीच्या झालेल्या आक्रोश मोर्चाच्या सभेत बोलताना खा. अमोल कोल्हे म्हणाले, नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीत आमच्यासमोर दोन पर्याय होते.
एक दडपशाहीसमोर गुडघे टेकायचे, का ताठ मानेने समोरच्याच्या नजरेला नजर भिडवत सवाल विचारायचा? दुसरा मार्ग मी व खा. सुळे यांनी निवडला. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत.
शेतकरी चिरडला जातोय. याकडे सरकारचे लक्ष नाही. बारामतीत आल्यावर आक्रोश मोर्चाला तरुण-तरुणी, भगिनींचा प्रतिसाद संघर्षयात्रेत पाहायला मिळाला. यामागे शरद पवार नावाची ताकद आहे.
या वेळी खा. सुळे म्हणाल्या की, बारामती व पवार कुटुंबाचे सहा दशकांचे नाते आहे. मला साहेबांची मुलगी व दादांची बहीण म्हणून दिल्लीला पाठवले.
शरद पवारांनी शून्यातून विश्व निर्माण केले. बारामतीकरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत आमदार, मुख्यमंत्री, दिल्लीत महत्त्वाची पदे भूषवली.
भारत कृषिप्रधान देश असताना आपल्याकडे कृषिमंत्रीच नाही. यासाठी आम्ही आक्रोश मोर्चा काढला,
असे सांगत सुळे यांनी भाजपला ‘भ्रष्ट जुमला पार्टी’ असा उपाहासात्मक टोला लगावला. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अॅड. राजेंद्र काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.