खटाव तालुक्यात रब्बी हंगामात बहुतांशी ज्वारी पिकाचे उत्पादन घेतले जाते; परंतु या हंगामात ज्वारी पिकालाही किड अळीचा प्रादुर्भाव वाढत गेल्यामुळे
ज्वारीच्या उत्पादनात बरीच घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांच्या ताटातील भाकरीही महागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
खटाव तालुक्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून, शेतीबरोबरच या भागात मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसायही केला जातो. त्यामुळे तालुक्यात दुहेरी फायदा देणारे पीक म्हणून ज्वारी पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणावर केला जातो. ज्वारी हे खाण्यासाठी कसदार, पौष्टिक अन्न मानले जाते. सर्वसामान्य कुटुंबात वर्षभर खाण्यासाठी पुरवठ्याचे धान्य म्हणून ज्वारी पिकाकडे पाहिले जाते. ज्वारी पिकांचा कडबा म्हणजे वैरण जनावरांच्या चाऱ्याच्या दृष्टीने पोषक, पुरक व कसदार आहार मानला जातो.
त्यामुळे दुहेरी फायदा देणाऱ्या ज्वारी या पिकाकडे शेतकरी वर्गाची ओढ लक्षणीय असते. हक्काचे व रोगराई नसलेले पिक म्हणून ज्वारी पिकाची गणना केली जाते, पण सध्या हवामानातील बदलामुळे मका, गहू या पिकांप्रमाणेच ज्वारीवरही कीड अळीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.
ज्वारी पिकाचे आगार मानल्या जाणाऱ्या खातवळ, दातेवाडी, बोंबाळे, कातरखटाव, एनकूळ शिंगाडवाडी, यलमरवाडी, या परिसरात मोठ्या प्रमाणावर कीड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे आपसुकच यंदा खटाव तालुक्यात ज्वारी पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या ज्वारीचे दर चार ते पाच हजार रुपये क्विटलपासून पुढे असून, जुन्या कडब्याचे दर साधारण तीन ते चार हजार रुपये शेकडा आहे. चालू वर्षी किडीचा प्रादुर्भाव वाढत गेला, तर ज्वारी व कडब्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मुळे गरीबाच्या ताटातील भाकर यंदा महागणार, असे भाकीत शेतकरी वर्गाकडून वर्तविले जाते.