शेवग्याची शेंग (मुंगण्यांच्या शेंगा) आरोग्यासाठी तशी बहुगुणी आहे. या शेंगातील गुणधर्म शरीरासाठी फायदेशीर असतात.
त्यांच्या झाडाच्या पानांच्या माध्यमातून विविध उत्पादने तयार करत एका महिलेने स्टार्टअप सुरू करून गगनभरारी घेतली आहे.
नागपूरच्या या उद्योजिकेने तयार केलेल्या उत्पादनांची देशातच नव्हे, तर विदेशातही विक्री सुरू केली आहे.
मेक्सिको, अमेरिका बाजारपेठांमध्येही विकताहेत उत्पादने
देविका बजाज असे या महिला उद्योजिकेचे नाव आहे. त्यांनी २०१९ मध्ये शेवग्याची शेंग आणि त्यांच्या पानापासून पावडरसह विविध उत्पादने तयार करण्याच्या उद्देशाने दैविक मोरिंगा या नावाने स्टार्टअप सुरू केले.
व्यवस्थापन पदवीधर असलेल्या देविका बजाज यांना दुसरे मूल झाल्यावर त्यांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला.
वाढते वजन ही त्यांची मोठी समस्या होती. त्यातच दिवसेंदिवस डोळ्यांची दृष्टीही अधू होत चालली होती.
शरीरातील व्हिटॅमिन ‘बी’ची पातळी वाढणे आणि व्हिटॅमिन ‘डी’च्या पातळीत घट होणे ही चिंतेची बाब होती.
मात्र, कुठेतरी त्यांच्या वाचनात शेवग्याच्या शेंगा आणि त्यांच्या पानातील उत्कृष्ट गुणधर्मातून यावर मात करता येणे शक्य असल्याचे आले.
त्यांनी हा उपाय करण्याचे ठरवून नित्यनियमाने पानाची पावडर घेण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांना थोड्याच दिवसांत फरकही जाणवू लागला.
त्यामुळे पुढे याच शेवग्याच्या झाडाची पाने आणि शेंगांवर संशोधन करत, त्यांनी विविध उत्पादनेही तयार केली.
शेवग्याच्या पानात असलेले फॉस्फरस कॅलरी घटविते तर कॅल्शियम लठ्ठपणा कमी करते. याशिवाय मधुमेह, कर्करोगावर उत्तम औषध तर यकृतच्या आरोग्यासाठीही शेवगा गुणकारी आहे.
त्वचेसाठीही शेवगा खूप फायदेशीर आहे. त्यामुळे यापासून त्यांनी सौंदर्यवर्धक, हेल्थकेअर आणि वेलनेसची विविध उत्पादने तयार केली.
विशेष म्हणजे ही उत्पादने संपूर्णतः सेंद्रिय असल्याने त्यातून कुठल्याही प्रकारची हानी नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अॅमेझॉनच्या माध्यमातून सध्या मेक्सिको आणि अमेरिकेसारख्या बाजारपेठांमध्ये ही उत्पादने विकली जातात.
आपल्याकडे असलेल्या अनेक भाज्या आणि वनस्पतींमध्ये औषधीयुक्त गुण आहेत. त्यांची ओळख पटवून घेत, त्यातून समाजाला चांगले काय देता येईल, या भावनेतून हे स्टार्टअप सुरू केले.
देश-परदेशात या शेंगांना मागणी आहे. त्यामुळे व्यवसायाचा विस्तार वाढविला आहे. दुकान व्यावसायिकांकडून आमच्या प्रोडक्टला चांगली मागणी आहे.
डॉक्टर, आहारतज्ज्ञांकडूनदेखील शेंगा खाण्यासाठी रुग्णांना सांगितले जात आहे.- देविका बजाज, संस्थापक, दैविक मोरिंगा स्टार्टअप.