Sanjay Mishra Lonavala : बॉलीवूडमधील झगमगाट कोणाला आवडणार नाही. बॉलीवूडमध्ये येण्यासाठी, चित्रपटात काम करण्यासाठी हजारो लोक आजही अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र प्रत्येकजण बॉलीवूडमध्ये येऊ शकत नाही आणि प्रत्येकालाच या चंदेरी दुनियेत यश संपादित करता येत नाही.
दरम्यान, आज आपण अशा एका अवलियाविषयी जाणून घेणार आहोत ज्याने हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने यशाचा झेंडा रोवला आहे. परंतु आज हा अभिनेता आपल्या पुण्याजवळील लोणावळ्यातील एका छोट्याशा खेड्यात शेती करत आहेत.
आम्ही ज्या दिग्गज बॉलीवूड कलाकाराबाबत बोलत आहोत ते आहेत संजय मिश्राजी. संजय मिश्राजी यांनी आपल्या अभिनयातून लोकांना खदखदून हसवलं आहे. संजय मिश्रा यांनी बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका निभावलेली आहे.
त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटांमधील भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडल्या आहेत. त्यांनी त्यांच्या स्वकष्टाने बॉलीवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान तयार केलेले आहे.
मात्र आजच्या घडीला संजय मिश्राजी लोणावळ्यातील तिस्क्री येथे वास्तव्याला आहेत. या ठिकाणी त्यांनी दोन ते अडीच एक करत जागेवर त्यांचा फार्म हाऊस तयार केला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांनी एक झोपडीवजा घर बांधलेले आहे.
या घरात त्यांनी वाळू, सिमेंट आणि विटा यांचा वापर केलेला नाही. पारंपारिक पद्धतीने त्यांनी फक्त आणि फक्त लाकडांचा वापर करून या घराची निर्मिती केलेली आहे. मुंबईपासून १४० किलोमीटर अंतरावर वसलेल्या या ठिकाणी खूपच शांत वातावरण असून आता संजय मिश्राजी यांना मुंबईत जावेसे वाटत नाहीये.
सध्या स्थितीला त्यांनी त्यांच्या फार्म हाऊसमध्ये वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची आणि झाडांची लागवड केलेली आहे. विशेष म्हणजे गावकरी जसे साधे जीवन जगतात तसेच जीवन संजय मिश्रा जगत आहेत. संजय जी आपल्या फार्म हाऊसवर कोबी, वांगी, पालक, कोथिंबीर आणि टोमॅटो अशा भाज्या पिकवत आहेत.
याशिवाय त्यांनी हरभरा लागवड केलेली आहे. संजय स्वतः त्या पिकांची काळजी घेत आहेत. जेव्हा ही पिके मोठे होतील तेव्हा ते आपल्या कुटुंबियांना येथे घेऊन येणार आहेत. मिश्राजी म्हणतात ते मूळचे बिहार येथील आहेत, मात्र महाराष्ट्रीयन लोकांनी त्यांना आपलेसे केले आहे.
यामुळे त्यांना आता येथून कुठेच जावेसे वाटत नाही. खरे तर संजय हे एका छोट्याशा गावातील होते. मात्र त्यांच्या वडिलांचे सातत्याने ट्रान्सफर होत असे त्यामुळे त्यांना गावाकडील आयुष्य अनुभवता आले नाही.
यामुळे त्यांना गावाकडील आयुष्य जगायचे होते आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी या ठिकाणी फार्म हाऊस उभारला असून येथे ते आता शेती करत आहेत. विशेष म्हणजे येथे त्यांनी एक मंदिर आणि घाट देखील तयार करण्यास सुरुवात केली आहे.