पुणे : उच्चांकी तापमानाचे विक्रम आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस- गारपिटीचा जोरदार तडाखा, मे महिना असला तरी घसरलेला उन्हाचा पारा, आकाशात ढगांची गर्दी, पाऊस या सर्वांचा परिणाम वातावरणावर झाला आहे. परिणामी, उन्हाळ्याचा कालावधी घटलेला आहे. तसेच या बदलत्या हवामानामुळे आरोग्य, शेतीवर परिणाम झाला आहे
पुण्यात एप्रिल महिन्यातील उन्हाच्या तीव्र चटक्यानंतर मे महिन्यात वातावरण सध्या थंड आहे. पारा ३५ अंश सेल्सिअसच्या खाली आहे. नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला असला तरी याचा परिणाम शेतीवर होत आहे.
सर्वसाधारणपणे हिवाळा संपताना आणि उन्हाळ्याची सुरुवात होत असताना महाराष्ट्रात अवकाळी पाऊस येतो मान्सूनच्या पावसाच्या तुलनेत याचे प्रमाण अत्यल्प असते. पण, त्यामुळे शेतीचे होणारे नुकसान मात्र जास्त असते. हा पाऊस साधारण डिसेंबर – जानेवारी आणि मार्च – एप्रिल या दरम्यान पडतो
पुणे शहर आणि परिसरासाठी उन्हाळी हंगामातील सामान्य कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस मानले जाते. मात्र, ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे एप्रिल महिन्यात पुण्याचे तापमान सामान्यपेक्षा कमी होते.
मागील तीन वर्षांनंतर अशी स्थिती पुणेकरांना अनुभवता आली आहे. एप्रिलच्या ३० दिवसांपैकी २० दिवस तापमान कमी झाले. एप्रिल महिन्यात पुणे जिल्ह्यात २४.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस मागील दहा वर्षांतील सर्वाधिक होता.
मे महिन्यात सुद्धा कायम राहणार पाऊस !
मे महिन्यातदेखील पुणे शहर आणि परिसरातील तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील काही दिवस अंशतः ढगाळ हवामान राहणार असून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच, अवकाळी पाऊस झाल्यानंतर हवामान पूर्ववत होईल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे
उन्हाळ्याचा कालावधी होतोय कमी !
उन्हाळ्याची चाहूल संक्रांतीला लागते. फेब्रुवारीपासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते. मात्र, गेल्या काही वर्षांबरोबर यंदाही उन्हाळ्याचा कालावधी घटत असल्याचे दिसून येत आहे. एप्रिलमध्ये काही दिवस वगळता उन्हाळ्याचे चटके जाणवले नाहीत.
मे महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्येही ढगाळ हवामानाबरोबर पाऊस पडला आहे. यामुळे उन्हाळ्याचा १२० दिवसांचा कालावधी घटून तो सुमारे ९० दिवसांवर आला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे याचा परिणाम ऋतुचक्रावरही होत असून अवकाळी पाऊस, गारपीट, कमाल तापमानात अचानक वाढ-घट, ढगाळ हवामान असे वातावरण पाहायला मिळत आहे