Pune Weather Update : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. खरंतर नोव्हेंबर 2023 च्या अखेरीस राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता.
यानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामान पाहायला मिळाले. यामुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील पिकांवर मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळाला.
यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या गहू आणि हरभरा पिकाला मोठा फटका बसला असून उत्पादनात घट येऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाची हजेरी लागणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टामुळे मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे.
कसे राहणार हवामान ?
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. पुण्यात देखील अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आगामी तीन दिवस अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच 6 जानेवारीपर्यंत पुण्यात अंशतः ढगाळ हवामान राहणार आहे.
यानंतर मात्र पुढील तीन दिवस म्हणजेच सहा जानेवारीपासून पुढील तीन दिवस पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान पुण्यात तयार झालेल्या ढगाळ हवामानामुळे गारठा कमी झाला आहे.
पुण्यातील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. पुढील दोन दिवसात पुणे शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढणार असा अंदाज आहे.
पुण्यासह राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील आगामी काही दिवस ढगाळ हवामानाची आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गोव्यात सुद्धा अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.