Pune Weather Update : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. 18व्या लोकसभेसाठी सध्या मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. खऱ्या अर्थाने देशात लोकशाहीचा महा कुंभ सजला आहे. निवडणुकीमुळे सध्या संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे.
आतापर्यंत देशात एकूण तीन टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत संपूर्ण देशभरात एकूण सात टप्प्यात आणि आपल्या महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे.
आतापर्यंत रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 24 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पूर्ण झाले आहे.
चौथ्या टप्प्याचे मतदान हे येत्या सोमवारी अर्थातच 13 मे 2024 ला होणार आहे. नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
दरम्यान निवडणुकीच्या धामधुमीत पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्यात मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 13 मेला मतदान होणार असून या दिवशी शहरासहित जिल्ह्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पुण्यात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान आता आपण आगामी सहा दिवस पुण्यातील हवामान कसे राहणार या संदर्भात हवामान खात्याने काय म्हटले आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे राहणार आगामी 6 दिवसांचे हवामान ?
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात आजपासून अर्थातच आठ मे 2024 पासून पुढील चार दिवस म्हणजे शनिवारपर्यंत आकाश सकाळी मुख्यतः निरभ्र, तर दुपारनंतर अंशतः ढगाळ पाहायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे या कालावधीत कमाल तापमानात थोडीशी वाढ पाहायला मिळणार असून काही ठिकाणी कमाल तापमान 40°c पर्यंत पोहोचणार आहे. तसेच, पुणे शहर आणि परिसरात मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दिवशी पावसाचा अंदाज आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी अर्थातच 12 मे रोजी आणि मतदानाच्या दिवशी अर्थातच 13 मे ला आकाश मुख्यतः ढगाळ राहून मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आयएमडीच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.