Pune Successful Farmer : गेल्या काही दशकात राज्यात शेती मध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता राज्यातील शेतकरी फक्त पारंपारिक शेतीवर अवलंबून राहीलेले नाहीत. शेतकऱ्यांनी आता नगदी पिकांची शेती सुरू केली आहे. राज्यात फुल शेती देखील बहुतांशी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील फुलशेतीच्या माध्यमातून लाखों रुपयांची कमाई करून दाखवली आहे. पुरंदर तालुक्यातील चांबळी येथील एका प्रयोगशील शेतकऱ्यांनी सोनचाफा फुल शेतीच्या माध्यमातून अवघ्या वीस गुंठ्यात अडीच ते तीन लाखांपर्यंतचे उत्पादन मिळवून दाखवले आहे.
त्यामुळे सध्या या शेतकऱ्याची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे. मोहन कामठे असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव असून गेल्या चार वर्षांपासून मोहन सोनचाफा या फुलशेतीच्या माध्यमातून लाखोंची कमाई करत आहेत. मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार ते पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करत.
पारंपारिक शेतीमध्ये मात्र त्यांना अपेक्षित अशी कमाई होत नव्हती. अशातच ते आपल्या मामाच्या गावाला गेलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी सोनचाफ्याची शेती पाहिली. मग काय त्यांनी आपणही सोनचाफा शेती करायची असा निर्धार केला आणि या शेतीतील बारकावे त्यांनी शिकून घेतले. यानुसार त्यांनी आपल्या अर्धा एकर जमिनीत रत्नागिरी येथून रोपें मागवून सोनचाफा लागवड केली.
या सोनचाफा फुलांच्या पिकाची योग्य पद्धतीने त्यांनी काळजी घेतली आणि यातून आता त्यांना लाखो रुपयांची कमाई होत आहे. सोनचाफा फुलांची ते गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या विक्री करत आहे. खरं पाहता सोनचाफ्याच्या फुलांचा उपयोग अनेक ठिकाणी होतो मात्र याचे उत्पादन खूपच कमी प्रमाणात होते.
त्यामुळे या फुलांना बाजारात चांगली मागणी आहे. हेच कारण आहे की मोहन यांनी सोनचाफा फुल शेतीचा प्रयोग करून पाहिला आणि हा त्यांचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे आता मोहन यांना या सोनचाफा फुल शेतीची लागवड वाढवायची आहे. निश्चितच या प्रयोगशील शेतकऱ्याने केलेला हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे यात तीळ मात्र देखील शंका नाही.