Pune Success Story
Pune Success Story

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलाचे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. कोरोना काळामध्ये अकॅडमी सोडून स्वतःच्या घरी थांबून केलेला दिवसभरातील १२ ते १४ तास अभ्यास कामी आल्याने त्याचे जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पडवी येथे शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेला सोहम मांढरे याने वयाच्या २७व्या वर्षी यूपीएससी परीक्षेमध्ये देशांमध्ये २१८वी रँक मिळवत देदीप्यमान यश मिळवले आहे.

एवढ्या कमी वयात दौंड तालुक्यातील अधिकारी बनण्याचे किंबहुना हे पहिलेच उदाहरण आहे. याआधी सोहमने सन २०२१ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देत देशातून २६७वी रँक मिळवून भारतीय महसूल सेवेत रुजू झाले होते. एवढ्यावरच समाधान न मानता आपले जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न सोहमने असल्याने पुन्हा एकदा जोमाने अभ्यास करीत आज या यशाला गवसणी घातली आहे.

पदवी घेतल्यानंतर बारामती (Baramati) ‘एमआयडीसी’त काम करण्याचा विचार असल्याचे सोहमने सांगितले. तो म्हणाला, “अभियांत्रिकीची पदवी चांगल्या गुणांनी घेतल्यानंतर ‘एमआयडीसी’तील कंपनीत काम करण्याचा विचार होता.दरम्यान, मित्र आणि शिक्षकांशी बोलल्यानंतर खासगी आणि शासकीय नोकरीतील फरक जाणविला. अधिकारी होऊन विविध स्तरावर लोकांची सेवा करता येईल, असा विचार केला.

त्यातूनच नोकरी न करता स्पर्धा परीक्षेला काही वेळ देण्याचा निर्णय घेतला.” सोहम मांढरे यांचे प्राथमिक शिक्षण दौंड तालुक्यातील पडवी येथील जिल्हा परिषद शाळा, श्रीराम विद्यालयात झाले असून, उच्च माध्यमिक शिक्षण बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये झाले आहे.

सोहमचे वडील सुनील ईश्वर मांढरे हे शेतकरी असून, आई कल्पना प्राथमिक शाळा, दंडवाडी (सुपे) येथे शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. सोहम लहानपणापासूनच शाळेत अगदी हुशार होता. आई शिक्षिका असल्याने अभ्यासाचा संस्कार अगदी लहान वयात सोहमवर झाला होता. अगदी प्रत्येक वर्गात सोहमचा प्रथम क्रमांक ठरलेला असायचा.

दहावी बारावीतही सोहम प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. पुढे इंजिनिअरींगमध्येही सोहमने प्राविण्य मिळवलं.पण इंजिनिअर झाल्यावरही सोहम स्वस्थ बसला नाही. त्याला नागरी सेवेत जायचं होतं. त्यादृष्टीने त्याने तयारी सुरु केली.

नागरी सेवेच्या अभ्यासाला सुरुवात करुन काही महिनेच उलटले की कोरोनाचं संकट आलं. पण कोरोनाच्या संकटातही तो डगमगला नाही त्याने जिद्दीने आणि उमेदीने अभ्यास सुरुच ठेवला. आपल्या स्वप्नरुपी वृटवृक्षाला त्याने नियमित अभ्यासाचं खतपाणी घातलं. परिश्रम केले की यश मिळतेच, हे त्याला चांगलं माहिती होतं. झालंही तसंच, ३ वर्षातच त्याने यूपीएससी क्रॅक केली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *