Pune Ring Road : गेल्या काही वर्षांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा मोठा विस्तार झाला आहे. शिक्षणाचे माहेरघर पुणे आता वाहतूक कोंडीसाठी विशेष ओळखले जाऊ लागले आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यामुळे आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात दोन नवीन रिंग रोड विकसित केले जाणार आहेत. हे दोन्ही रिंगरोड शहरातील वाहतूक कोंडी फोडतील असा आशावाद व्यक्त होत आहे.
शिवाय या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे आणि पुणे महानगर प्रदेशाचा विकास सुनिश्चित होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांना आता मुहूर्त लागला आहे. या चालू वर्षात या दोन्ही प्रकल्पांचे भूसंपादन बऱ्यापैकी पूर्ण करण्यात आले आहे.
भूसंपादनाचे काम बऱ्यापैकी झाले असल्याने आता प्रत्यक्षात कामाला केव्हा सुरुवात होणार हा सवाल पुणेकरांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. पीएमआरडीएचा रिंग रोड आणि राज्य रस्ते विकास महामंडळाचा रिंग रोड या दोन्ही प्रकल्पांपैकी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रकल्पाने बाजी मारली आहे.
दरम्यान, येणाऱ्या नवीन वर्षात या दोन्ही प्रकल्पाचे बांधकाम सुरू होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. एम एस आर डी सी च्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या 170 किलोमीटर लांबीच्या रिंग रोडचे एकूण दोन टप्प्यात काम पूर्ण केले जाणार आहे.
पूर्व रिंग रोड आणि पश्चिम रिंग रोड अशा दोन भागात याचे काम होणार आहे. यापैकी पश्चिम रिंग रोडचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. तर पूर्व रिंग भागातील भूसंपादन देखील जलद गतीने सुरू असून येत्या काही महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल असे बोलले जात आहे.
यामुळे एमएसआरडीसीच्या या रिंग रोड साठी नवीन वर्षात निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होईल अशी आशा आहे. दुसरीकडे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या रिंग रोड साठी देखील भूसंपादनाची कार्यवाही सुरू झाली आहे.
पहिल्या टप्प्यात साडेपाच किलोमीटर लांबीचे भूसंपादन पूर्ण केले जाणार आहे. त्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न देखील सुरू आहेत. एकंदरीत येत्या काही महिन्यात या दोन्ही प्रकल्पांचे काम सुरू होणार आहे.
यामुळे उशिरा का होईना पण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फुटणार असे सांगितले जात आहे. या प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरात बाहेरून येणारी वाहतूक शहर हद्दीत न येता परस्पर बाहेरून जाणार आहे.
यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होणार आहे. यामुळे वाहतुक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. एवढेच नव्हे, तर पुणे जिल्ह्यात नव्याने गुंतवणुकीला चालना सुद्धा मिळणार आहे.