Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंग रोड चे काम हाती घेतले आहे. हा प्रकल्प पुणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे असे शासनाचे आणि प्रशासनाचे धोरण आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिकांना देखील हा प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा आणि जिल्ह्याचा विकास सूनिश्चित केला जावा अशी आशा आहे.
दरम्यान पुणे रिंग रोड संदर्भात एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या बदल्यात मिळणारा मोबदला आणि जमीन ताब्यात घेण्याच्या नोटीस जूनअखेरपासून पाठविण्यास सुरुवात होणार आहे. नोटीस बजावल्यानंतर या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन सुरू होणार आहे. खरं पाहता या प्रकल्पासाठी जमीन मूल्यांकनाची बहुतांशी प्रक्रिया या आधीच पूर्ण झाली होती.
मात्र शासनाने फेरमूल्यांकन करण्याच्या सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर आता या प्रकल्पासाठी चे फेर मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. यानुसार पश्चिम भागातील रिंग रोडचे फेरमुल्यांकनाचे काम जवळपास पूर्ण झाले असून पूर्व भागातील फेर मूल्यांकनाचे काम देखील आगामी काही दिवसात पूर्ण होणार आहे. मग फेरमूल्यांकनानुसार प्रकल्पग्रस्तांना द्यायच्या मोबदल्याचे तक्ते अद्ययावत केले जाणार आहेत.
त्यानंतर पुन्हा मान्यता घेऊन जूनअखेरपासून प्रकल्पग्रस्तांना किती जमीन संपादित केली जाणार आहे, त्याचा मोबदला किती मिळेल, याबाबतची नोटीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानंतर मग आठ ते पंधरा दिवसांच्या कालावधीत संबंधित जमीनधारकांकडून मान्यता घेऊन तातडीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येईल.
स्वत:हून जमीन देणार्यांना अतिरिक्त मोबदला दिला जाणार असल्याची माहिती देखील भूसंपादन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. एकंदरीत पुणे रिंग रोड साठी लवकरच भूसंपादन पूर्ण करून या रिंग रोडचे काम प्रत्यक्ष सुरू केले जाणार आहे.
कसा आहे हा प्रकल्प? प्रकल्पाची सद्यस्थिती काय?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या पुणे रिंग रोडची एकूण लांबी 172 मीटर आणि रुंदी 110 मीटर आहे. याचे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. पश्चिम रिंग रोड आणि पुणे रिंग रोड असे या प्रकल्पाचे विभाजन करण्यात आले असून या दोन टप्प्यात हा रिंग रोड पूर्ण केला जाणार आहे. रिंग रोड साठी जवळपास 1701 हेक्टर जमीन संपादित होणार आहे.
यामध्ये 1601 हेक्टर जमीन ही खाजगी आहे. पूर्व भागात मावळ तालुक्यातील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावांचा समावेश आहे, तर पश्चिम भागात भोरमधील 5, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळ तालुक्यातील सहा गावांचा समावेश आहे.
मावळ, मुळशी, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यांतून हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. पूर्व आणि पश्चिम रिंगरोड मावळ, मुळशी, हवेली, भोर, खेड आणि पुरंदर तालुक्यातून जातात. या प्रकल्पामुळे 83 गावे बाधित होणार असून 77 गावांची मोजणी देखील पूर्ण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष बाब म्हणजे भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या पहिल्या टप्प्यासाठी 250 कोटी रुपये मंजूर झाले असून ही रक्कमही प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनानुसार सध्याचे बाजारमूल्य (पुन्हा मोजलेले) दर, गेल्या पाच वर्षांत केलेले व्यवहार आणि परिसरातील इतर प्रकल्पांना दिलेला दर यापैकी जो जास्त असेल तो दिला जाणार आहे.
किती खर्च होणार?
पुणे रिंग रोड ची एकूण लांबी 172 किलोमीटर असून पूर्व भाग 68 किलोमीटरचा आणि पश्चिम भाग 104 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पासाठी 39,378.78 कोटी रुपये खर्च होणार असल्याचा सुधारित अंदाज आहे. एकंदरीत आता फेर मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने लवकरच पुणे रिंग रोड साठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आणि प्रकल्पासाठी जमिनी प्रत्यक्षात ताब्यात घेतल्या जाणार असल्याचे चित्र आहे.