Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे या शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

या प्रकल्पांतर्गत 170 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रस्ता तयार होणार आहे. या प्रकल्पाचे काम एकूण दोन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात या प्रकल्पाचे काम विभागण्यात आले आहे.

या प्रकल्पाच्या पश्चिम भागातील भूसंपादनाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. पश्चिम भागातील जवळपास 70 टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. यामुळे आता पूर्व रिंग रोडच्या भूसंपादनासाठी देखील गती प्राप्त झाली आहे.

पूर्व रिंग रोड मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधून प्रस्तावित करण्यात आला असून या तालुक्यांमधील 46 गावांत हा रस्ता जाणार आहे. विशेष म्हणजे या 46 गावांमध्ये जमिनीच्या दर निश्चित करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे यापैकी मावळ तालुक्यातील सहा गावांमध्ये जमिनीचे दर अंतिम करण्यात आले आहेत. वडगाव, कातवी, वराळे, आंबी, आकुर्डी, माणोलीतर्फ चाकण या सहा गावांमध्ये ७३.६१ हेक्टर जमीन संपादित केले जाणार असून यासाठी 883 कोटी 55 लाख रुपयांचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे.

आता या संबंधित गावातील जमीन धारकांना भूसंपादनाची नोटीस बजावली जाणार आहे. नोटीस मिळाल्यानंतर जे शेतकरी मुदतीत संमती पत्र देतील त्यांना 25% अतिरिक्त मोबदला मिळणार आहे.

बांधकामाला केव्हा सुरुवात होणार

मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होणार आहे. दरम्यान या आचारसंहितेपूर्वीच या प्रकल्पाच्या बांधकामाची सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी आता निविदा देखील मागवण्यात आल्या आहेत.

पूर्व आणि पश्चिम भागातील रिंग रोडच्या बांधकामासाठी टेंडर मागवण्यात आले असून यासाठी इच्छुकांना एक मार्च 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी निविदा दाखल झाल्यानंतर चार मार्च 2024 ला या निविदा उघडल्या जाणार आहेत.

कसे होणार बांधकाम

पश्चिम रिंग रोडचे बांधकाम एकूण पाच टप्प्यात आणि पूर्व रिंग रोडचे बांधकाम एकूण चार टप्प्यात केले जाणार आहे. पश्चिम रिंग रोड चा पहिला टप्पा 14 किलोमीटरचा, दुसरा टप्पा 20 किलोमीटरचा, तिसरा टप्पा 14 किलोमीटरचा, चौथा टप्पा साडेसात किलोमीटरचा, पाचवा टप्पा 9.30 किलोमीटरचा राहणार आहे.

तसेच पूर्व रिंग रोड चा पहिला टप्पा 11.85 किलोमीटरचा, दुसरा टप्पा 13.80 किलोमीटरचा, तिसरा टप्पा 21.20km चा आणि चौथा टप्पा 24.50 किलोमीटरचा राहणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *