Pune Real Estate ; पुणे शहराच्या पूर्व भागात हडपसर विस्तारले आहे. विशेषतः गेल्या काही वर्षांत हडपसरमध्ये नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी टाऊनशिप उभारल्या आहेत. त्यामुळे हडपसरचा चेहरामोहरा बदलला आहे, भविष्यात हडपसर ही स्वतंत्र महानगरपालिका होऊ शकते. एवढा विस्तार हडपसरचा झाला आहे. येथे उद्योगधंद्याबरोबरच मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या, मोठमोठे मॉल या परिसरात आल्याने रोजगाराच्या संधी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून; तसेच देश- परदेशातून याठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक येऊन स्थायिक झाले आहेत. या मोठ्या लोकसंख्येसाठी बांधकाम व्यावसायिकांनी अनेक प्रकल्प उभारले आहेत. तसेच, आणखी प्रकल्पांचे काम सुरू असून लोकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी घरे उपलब्ध होत आहेत.

हडपसरमध्ये फ्लॅटचा दर काय ?

१ बीएचके ३० ते ५० लाख
२ बीएचके ४० ते १ कोटी रुपये
३ बीएचके ७० लाख ते दीड कोटी रुपये
बंगलो/रो हाऊस ८० लाख ते २ कोटी रुपये

हडपसर हे निवासी संकुले, औद्योगिक यूनिट्स आणि आयटी पार्क यांचे मिश्रण असलेला विकसनशील परिसर आहे. मुख्यतः हडपसर है मगरपट्टा (मगरपट्टा स्पेशल इकॉनॉमिक झोन), फुरसुंगी (एस.पी इन्फोसिटी) आणि खराडी (ईओन आयटी पार्क, वर्ल्ड ट्रेड सेंटर) आदी भागात आयटी झोन झाल्याने हडपसरला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

हडपसर आयटी हब जगातील काही मोठ्या कॉर्पोरेशनचे निवासस्थान झाले आहे. त्यामुळे स्थलांतरितांचा ओघ येथे सातत्याने वाढत आहे. परिणामी, पायाभूत सविधा आणि घरांची मागणी वाढत आहे. पुण्यात दरवर्षी स्थलांतरित लोकांची संख्या लक्षणीयरीत्या बाढत आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात परराज्यातून नागरिक येत असतात. त्यातील बहुतांश लोक राहण्यासाठी हडपसरला पसंती देत आहेत. त्यामुळे पुण्यात गुंतवणूक करण्यासाठी हडपसर परिसरांमध्ये घरे खरेदी करण्याचा विचार नक्की करता येऊ शकतो.

हडपसरलगतच मुंढवा, खराडी, मांजरी, शेवाळवाडी, फुरसुंगी, वानवडी, कोरेगाव पार्क आणि कल्याणी नगर असे भाग आहेत. यातील कोरेगाव पार्क आणि कल्याणीनगर हे दोन्ही भाग पुण्यातील टॉप लाइफस्टाइल असलेल्या डेस्टिनेशन्सपैकी एक आहेत, हडपसरमधून पुणे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग ६५ क्रमांक जात आहे, तर हडपसरपासून पाच-सात किलोमीटर अंतरावरून पुणे- अहमदनगर हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. तसेच, पुणे रेल्वे स्टेशन कनेक्टिव्हिटी आणि पुणे (लोहगाव) आंतरराष्ट्रीय विमानतळ हडपसरपासून सुमारे १० किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे हडपसरला कनेक्टिव्हिटीची सुविधा चांगली आहे.

हडपसरमध्ये रेडिरेकनरचा दर काय?
हडपसरच्या काही भागामध्ये रेडिरेकनरचा दर हा वेगवेगळा आहे. मगरपट्टा, अॅमनोरा टाऊनशिप, सातव वस्ती रस्ता तसेच हडपसर गावठाण भागात रेडिरेकनरचा दर वेगवेगळा आहे. साधारणपणे ४००० ते ९००० रुपयाचा दर आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना या भागात परवडणारी घरे उपलब्ध होत असल्याने नागरिकांची सर्वाधिक पसंती हडपसरला मिळत आहे.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *