Pune Real Estate News : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थातच पुणे शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वधारली आहे. शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शिक्षण, व्यापार, नोकरी इत्यादी कामांसाठी पुणे शहरात वास्तव्याला येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे.
विशेष म्हणजे जो कोणी पुण्यात पाय ठेवतो तो पक्का पुणेकर बनतो. पुणे शहरात आल्यानंतर येथे घर खरेदी करण्याचे प्रत्येकजण स्वप्न पाहत असतो. हेच कारण आहे की, शहरात दिवसेंदिवस सदनिकांची विक्री वाढत आहे.
अशातच शहरातील सदनिकांच्या विक्री संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी 2024 मध्ये पुणे जिल्ह्यात मालमत्तांच्या विक्रीमध्ये जानेवारी 2023 च्या तुलनेत मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात 17,785 मालमत्तांची विक्री झाली आहे. यातील 70% मालमत्ता या निवासी होत्या. गेल्या महिन्यात जानेवारी 2023 च्या तुलनेत 46% अधिक मालमत्तांची विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे.
अर्थातच पुणे शहराला वास्तव्यासाठी अजूनही पसंती मिळत आहे. याबाबत नाईट फ्रॅंक इंडियाने सविस्तर अहवाल दिला आहे. या अहवालानुसार जानेवारी 2024 मध्ये 17785 मालमत्तांची विक्री झाली आहे.
गेल्या 24 महिन्यांच्या काळात जानेवारी महिन्यात सर्वाधिक मालमत्ता विकल्या गेल्या आहेत. अर्थातच रियल इस्टेट क्षेत्रातसाठी जानेवारी 2024 चा महिना फायदेशीर ठरला आहे. दरम्यान या अहवालात गेल्या महिन्यात २५ लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांच्या विक्रीचा वाटा २२ टक्के, २५ ते ५० लाख रुपयांच्या घरांचा वाटा ३१ टक्के, ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या घरांचा वाटा ३२ टक्के, १ ते २.५ कोटी रुपयांच्या घरांचा वाटा १३ टक्के, २.५ ते ५ कोटी रुपये आणि ५ कोटी रुपयांवरील घरांचा वाटा प्रत्येकी १ टक्का असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अर्थातच एक कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
कोणत्या घरांना मिळाली सर्वाधिक पसंती
पुणेकरांनी मध्यम घरांना विशेष पसंती दाखवली आहे. जानेवारी 2024 मध्ये 500 ते 800 चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांचा 41%, 500 चौरस फुट पर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरांचा 33%, 800 ते 1000 चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांचा 13%, 1000 ते 2000 चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांचा अकरा टक्के आणि 2 हजार चौरस फूट क्षेत्रफळांपेक्षा अधिक आकारमान असलेल्या घरांच्या विक्रीचा वाटा तीन टक्के एवढा होता.