Pune Real Estate : आयटी हब आणि औद्योगिक कंपन्यामुळे पुणे शहराच्या चारही बाजूने मोठ्याप्रमाणात नागरीकरण वाढत आहे. व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी निवासी वसाहत शहरालगत त्यामुळे नव्याने उपनगरे विकसित होत आहेत. गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित होत असलेल्या मांजरीमध्ये मोठ्याप्रमाणात बांधकामे सुरू आहेत.
ग्रामीण आणि शहरी अशा दोन्हींचा बाज येथे पाहायला मिळत आहे. मांजरीत मुबलक प्रमाणात जमीन उपलब्ध असल्याने अनेक नामवंत बांधकाम व्यावसायिकांचे एक एकरापासून ५०, १०० एकरांमध्ये व्यावसायिक आणि निवासी प्रकल्प येथे अलीकडच्या काही वर्षांत उभे राहिले आहेत.
खराडी आयटी हबला लागून मांजरी गावाचा विस्तीर्ण परिसर आहे. मंजरीमध्ये आगदी एक गुंठ्यापासून काही एकरचा भाव सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा आहे. त्यामुळे कमी किमतीत येथे मध्यमवर्गीय नोकरदारांना जागा घेऊन घरे बांधता येतात.
अतिशय कमी किमतीत मालमत्ता खरेदी करता येत आसल्याने नागरीकरण वेगाने होत आहे. या भागात स्थायिक होणाऱ्यांमध्ये बहुतांश नागरिक हे पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती इंदापूर, तसेच सोलापूर जिल्हयासह मराठवाड्यातील आठही जिल्हयातून नागरिक येथे वास्तव्याला आले आहेत.
त्याच्या जोडीला छोटे-मोठे व्यावसाय देखील येथे सुरू झाले आहेत. खराडी, मगरपट्टा, अॅमनोरा या आयटी हबमुळे मांजरी परिसरात इतर छोटे-मोठे औद्योगिक कारखानेदेखील उभे राहिले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्थानिक नागरिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे.
वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट, द्राक्ष भागायत संशोधन केंद्र यामुळे मांजरीला राज्यस्तरीय एक वेगळी ओळख मिळाली आहे. तसेच, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मांजरीत उपबाजार केंद्र असल्याने हवेली आणि दौंड तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी माल घेऊन येत असतात. त्यामुळे मांजरीसह शेवाळवाडी, कदमवाकवस्ती, हडपसर, फुरसुंगी या भागातून छोठे व्यावसायिक येथे सकाळ- संध्याकाळच्या वेळेत खरेदीसाठी येत असतात.
मांजरीत रेडीरेकनरचा दर काय?
मांजरीच्या काही भागात रेडीरेकनरचा दर हा वेगवेगळा आहे. पुणे-सोलापूर रस्ता, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, मांजरी- आव्हाळवाडी रस्ता, मांजरी- केशवनगर रस्ता, वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट परिसर, मांजरी गावठाण आदी भागात रेडीरेकनरचा दर वेगवेगळा आहे. या परिसरात साधारणपणे १ हजार ५०० रुपये ते सहा हजार रुपयांचा दर आहे.
विद्यार्थ्यांची संख्या वाढली
मांजरी गावात अण्णासाहेब मगर महाविद्यालय असल्याने परिसरातील अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी आले आहेत. ते परिसरामध्ये रूम अथवा फ्लॅट घेऊन राहात आहेत.
त्यामुळे या परिसरामध्ये घरगुती खानावळी, हॉटेलची संख्यादेखील वाढली असून स्थानिक नागरिकांना त्यातन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, आंबाजोगाई, उदगिर आणि लातूर तसेच नांदेड याभागातील शेकडो विद्यार्थी येथे शिक्षण तसेच नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत.