Pune Railway News : नववर्ष सुरू होण्यापूर्वीच पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नवीन वर्षात पुणेकरांना एक मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात पुणेकरांसाठी दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी माहिती समोर आली आहे.
खरे तर सध्या संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेस या संपूर्ण भारतीय बनावटीच्या हायस्पीड ट्रेनची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. ही गाडी 2019 मध्ये सर्वप्रथम रुळावर पाहायला मिळाली होती. रुळावर गाडी धावली आणि रेल्वे प्रवाशांच्या मनात ही गाडी अल्पकालावधीतच घर करून गेली.
यामुळे देशातील विविध भागातील रेल्वे प्रवाशांकडून ही गाडी त्यांच्या भागात सुरू करण्याची मागणी केली जात आहे. आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी सहा गाड्या या आपल्या महाराष्ट्रातूनच धावत आहेत.
सहापैकी चार गाड्या एकट्या मुंबई मधून धावत आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या चार मार्गांवरील गाड्या राजधानी मुंबई मधून धावत आहेत.
यापैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर ही एकमेव गाडी पुण्या मार्गे धावत आहे. म्हणजेच पुण्याला आधीच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. मात्र थेट पुणे रेल्वे स्थानकावरून अजून एकही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही.
आता मात्र पुणेकरांची ही देखील प्रतीक्षा संपणार आहे. आणखी थेट पुणे रेल्वे स्थानकावरून एक नाही तर दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला देखील आहे.
मध्य रेल्वेने पाठवलेल्या या प्रस्तावात पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते शेगाव या दोन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यास परवानगी मागितली गेली आहे. तथापि, रेल्वे बोर्डाने याबाबतचा अंतिम निर्णय घेतलेला नाही.
पण आगामी निवडणुकांचा काळ पाहता या दोन्ही मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यासाठी रेल्वे बोर्ड परवानगी देईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता या दोन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होते का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
वास्तविक, सध्या पुणे ते सिकंदराबाद दरम्यान शताब्दी एक्सप्रेस सुरू आहे. पण, ही एक्सप्रेस बंद करून त्याऐवजी वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा रेल्वेचा प्लॅन आहे. दुसरीकडे पुण्याहून शेगावला जाणाऱ्यांची संख्या देखील उल्लेखनीय आहे.
गजानन महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक शेगाव नगरीत हजेरी लावत असतात. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळावा म्हणून तसेच संत गजानन महाराजांच्या भक्तांना सुलभतेने दर्शन घेता यावे यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी होती. आता मात्र प्रवाशांची ही मागणी पूर्ण होणार अशी आशा आहे.