Pune Railway News : पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या शहराला अलीकडे आयटी हब म्हणूनही ओळख मिळाली आहे. या शहरात शिक्षणासाठी आणि कामानिमित्त, रोजगाराच्या शोधात दररोज देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक येतात.
येथे शिक्षण घेतात, रोजगार शोधतात. दरम्यान शहरात येणारे बहुतांशी नागरिक रेल्वे मार्गाने येतात. शहरातूनही रेल्वे मार्गानेच प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. दरम्यान पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
तो म्हणजे पुण्याहून एक विशेष साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. विशेष म्हणजे ही गाडी आजपासून अर्थातच 21 डिसेंबर 2023 पासून पुणे रेल्वे स्थानकावरून सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते मुजफ्फरपुर दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून आज, 21 डिसेंबर आणि 28 डिसेंबर रोजी रवाना होणार आहे. ही ट्रेन हे दोन दिवस रात्री नऊ वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून रवाना होईल आणि दोन दिवसानंतर मुजफ्फरपुर येथे सकाळी सहा वाजता पोहोचणार आहे.
तसेच मुजफ्फरपूर येथून ही सुपरफास्ट एसी विशेष एक्सप्रेस ट्रेन २० आणि २७ डिसेंबर रोजी चालवली जाणार आहे. ही ट्रेन मुजफ्फरपूर येथून दुपारी १ वाजता रवाना होईल आणि दोन दिवसानंतर रात्री ९ वा. पुणे येथे पोहचणार आहे.
विशेष म्हणजे ही गाडी या मार्गावरील जवळपास सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, कोपरगांव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबा घेईल अशी माहिती रेल्वेच्या माध्यमातून यावेळी समोर आली आहे. ही गाडी पुण्याहून उत्तर भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष फायद्याची ठरेल आणि या प्रवाशांचा प्रवास गतिमान होईल अशी आशा आहे.