Pune Railway News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहरावरून लवकरच विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून पंधरा विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने आखले आहे.

खरे तर सध्या संपूर्ण देशात राममय वातावरण पाहायला मिळत आहे. श्रीक्षेत्र अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशातील आणि जगातील समाजकारण, राजकारण, सिनेसृष्टी इत्यादी क्षेत्रातील नामांकित पाहुणे हजेरी लावणार आहेत.

या सोहळ्यासाठी हजारो लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्रातीलही अनेक लोकांना या सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाले आहे. दरम्यान हा सोहळा थाटात पार पडावा यासाठी उत्तर प्रदेश राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून विशेष तयारी करण्यात आली आहे.

प्रभू श्री राम मंदिरात विराजमान झाल्यानंतर राम भक्तांसाठी हे मंदिर खुले केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 23 जानेवारीपासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे.

मंदिर खुले झाल्यानंतर राम भक्त हजारोंच्या संख्येने श्रीक्षेत्र अयोध्येत दाखल होणार आहेत. पुण्यातूनही हजारो नागरिक अयोध्येला जाणार आहेत. अशा परिस्थितीत पुण्यातील भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने पंधरा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार या गाड्या 30 जानेवारी 2024 पासून सुरू केल्या जाणार आहेत. दर दोन दिवसांनी एक ट्रेन पुण्यावरून आयोध्यासाठी रवाना होणार आहे. विशेष म्हणजे या सर्व विशेष गाड्या स्लीपर कोच राहणार आहेत.

या एका गाडीतून सुमारे दीड हजार प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. या विशेष गाड्यांसाठी लवकरच बुकिंग सुरू होणार आहे. या गाडीला मिळणार प्रतिसाद पाहून मग विशेष गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल असे बोलले जात आहे.

या ट्रेन आस्था ट्रेनच्या नावाने चालवल्या जाणार आहेत. फक्त पुण्यातूनच नाही तर देशातील इतरही शहरातून अयोध्येसाठी ट्रेन चालवल्या जाणार आहेत. देशातील वेगवेगळ्या शहरातून जवळपास दोनशे विशेष गाड्या आयोध्या साठी चालवण्याचे नियोजन आहे.

यामुळे राम भक्तांना श्रीक्षेत्र अयोध्येला जाताना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई – अयोध्या – मुंबई, नागपूर – अयोध्या – नागपूर, पुणे – अयोध्या – पुणे, वर्धा – अयोध्या – वर्धा, जालना – अयोध्या – जालना या मार्गावर आस्था ट्रेन चालवली जाणार आहे. 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *