Pune Railway News : उन्हाळी सुट्ट्या सूरु आहेत अन यामुळे सध्या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक रेल्वे गाड्या हाउसफुल धावत आहेत. अतिरिक्त गर्दीमुळे मात्र रेल्वे प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे.
अशातच, पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुणे येथील हडपसर रेल्वे टर्मिनलवरून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी रेल्वे प्रशासनाने हडपसर ते गुवाहाटी दरम्यान विशेष एक्सप्रेस चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ही गाडी मे ते जून या कालावधीत चालवली जाणार आहे. ही उन्हाळी विशेष गाडी फक्त उन्हाळी हंगामातच चालवली जाणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ही गाडी प्रवासादरम्यान कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे ? याविषयी देखील आज आपण माहिती पाहणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
हडपसर ते गुवाहाटी दरम्यान चालवली जाणारी विशेष गाडी आठवड्यातून एक दिवस धावणार आहे. म्हणजे ही गाडी साप्ताहिक राहणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-गुवाहाटी साप्ताहिक विशेष रेल्वे ९ मे ते २७ जून या कालावधीत चालवली जाणार आहे.
या कालावधीत ही गाडी पुण्यातील हडपसर येथून दर गुरुवारी सकाळी १० वाजता सोडली जाणार आहे. तसेच ही गाडी गुवाहाटीला तिसऱ्या दिवशी सकाळी सव्वा 8 वाजता पोहचणार आहे. तसेच गुवाहाटी-हडपसर साप्ताहिक विशेष रेल्वे ६ मे ते २५ जून या कालावधीत चालवली जाणार आहे.
या काळात ही ट्रेन प्रत्येक सोमवारी गुवाहाटी येथून रात्री ८ वाजून ४० मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि हडपसरला तिसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. यामुळे या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
हाती आलेल्या माहितीनुसार, ही विशेष गाडी या मार्गावरील गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, पाटलीपुत्र, हाजीपूर, बरौनी, खगरिया, नवगछिया, कटिहार आणि न्यू जलपाईगुडी इत्यादी स्थानकांवर थांबा घेणार आहे. त्यामुळे या गाडीचा पुणे, अहमदनगर तथा खान्देशमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.