Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यातील विविध भागांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढली आहे. प्रचंड उष्णतेमुळे राज्यातील अनेक धरणांमधून जलद गतीने बाष्पीभवन होत असून पाण्याचा साठा खालावत चालला आहे. मराठवाडा विभागातील अनेक धरणांनी तळ गाठला आहे. मराठवाड्यासारखीच परिस्थिती पुणे जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे.
येथीलही अनेक धरणांनी तळ गाठला असून जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण चक्क कोरडे झाले आहे. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील मोठी तारेवरची कसरत करावी लागू शकते अशी भीती यानिमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे.
दरम्यान आता आपण सध्या स्थितीला पुणे जिल्ह्यातील कोणत्या धरणांमध्ये किती पाणी साठा शिल्लक आहे या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जलसंपदा विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील उजनीच्या धरणाचा अचल पाणीसाठा म्हणजे मृत पाणीसाठा 43 टक्क्यांनी कमी झाला आहे.
सध्या जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये फक्त 27.83 टीएमसी एवढा उपयुक्त पाण्याचा साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व धरणांच्या एकूण पाणीसाठ्यापैकी हे प्रमाण 14.03% एवढे आहे.
गेल्या वर्षी याच दिवसांत 46.58 टीएमसी उपयुक्त पाण्याचा साठा जिल्ह्यातील धरणांमध्ये शिल्लक होता. म्हणजे गेल्या वर्षाशी तुलना केली असता 18.75 टीएमसी एवढा उपयुक्त पाण्याचा कमी साठा शिल्लक असल्याचे समजतं आहे.
जिल्ह्यातील हे धरण कोरडे पडले
हाती आलेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण हे आताच कोरडेठाक झाले आहे. उजनीतील पाण्याचा साठा देखील कमी होत चालला आहे. या धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस मध्ये आहे. उजनीचा उपयुक्त पाणीसाठा उणे ४२.९८ टक्के इतका असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून प्राप्त झाली आहे.
आतापर्यंत उजनी धरणातील अचल (मृतसाठा) साठ्यातील २३.०२ टीएमसी (४२.९८) टक्के पाणी वापरले गेले असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील टाटा उद्योग समूहाच्या धरणांचा पाण्याचा साठा देखील मोठ्या प्रमाणात कमी होत चालला आहे.
मुळशी, ठोकळवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली या टाटा समूहाच्या सहा धरणांमध्ये फक्त 15.65 टीएमसी अर्थातच 36.60% एवढा उपयुक्त पाणी साठा शिल्लक असेल याची माहिती समोर आली आहे. या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ४२.७६ टीएमसी एवढी आहे.
निश्चितच जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याचा साठा जलद गतीने खालावत असल्याने ही पुणेकरांसाठी एक चिंतेची बाब आहे. मात्र असे असले तरी यावर्षी मान्सून काळात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही हवामान तज्ञांनी यंदा मान्सून आगमन वेळेआधी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
सध्या प्रचंड उष्णता जाणवत असल्याने यामुळे समुद्रावरील पाण्याचे जलद गतीने बाष्पीभवन होत असून समुद्रावरील हवेचा दाब वाढत चालला आहे, हेच कारण आहे की मान्सूनचे आगमन हे वेळे आधीच होऊ शकते असे निरीक्षण हवामान तज्ञांनी नोंदवले आहे. निश्चितच मानसून जर वेळेआधी दाखल झाला तर याचा शेतकऱ्यांसहित सर्वसामान्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.