Pune News : पुणे अन पिंपरी चिंचवड शहराचा गेल्या काही वर्षांमध्ये मोठा विस्तार झाला आहे. यामुळे शहरातील पायाभूत सुविधांवर मोठा ताण येत आहे. प्रामुख्याने रस्ते, रेल्वे, वीज आणि पाणी या महत्त्वाच्या घटकांवर मोठा ताण येऊ लागला आहे. शहराचा विस्तार वाढत असल्याने लोकसंख्या देखील वाढत चालली आहे.
शहरात खाजगी वाहनांची देखील संख्या झपाट्याने वाढली आहे. याचा परिणाम म्हणून आता शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. हेच कारण आहे की आता शहरात मेट्रो सुरु झाली आहे. शहरातील नागरिकांचा प्रवास जलद अन सुरक्षित व्हावा यासाठी शहरात मेट्रोमार्गांचे जाळे विकसित केले जात आहे.
आतापर्यंत शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट हा मार्ग सुरू झाला आहे. याशिवाय वनाज ते रामवाडी या मार्गापैकी वनाज ते रुबी हॉल क्लिनिक हा मार्ग सुरू झाला आहे.
विशेष म्हणजे सिविल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. याचाच अर्थ हे देखील काम लवकरच पूर्ण होईल आणि हे मार्ग सर्वसामान्यांसाठी लवकरच सुरू होणार आहेत.
नवीन वर्षात हे दोन्ही मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होतील अशी आशा आहे. अशातच आता पुणेकरांसाठी आणखी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचा विस्तारित मार्ग अर्थातच पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी या मेट्रो मार्गाचे काम देखील येत्या नवीन वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे.
कारण की या मेट्रो मार्गासाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे नवीन वर्षात निविदा प्रक्रिया पूर्ण करून या मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू होईल असे सांगितले जात आहे. या विस्तारित मेट्रो मार्गासाठी 910 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गाला ऑक्टोबर 2023 मध्ये केंद्र शासनाकडून मान्यता मिळालेली आहे. या प्रकल्पांतर्गत 4.519 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग तयार होणार आहे.
यासाठी 910.18 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महामेट्रोने हा मार्ग 3 वर्ष आणि 3 महिन्यात पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गासाठी बांधकाम स्वीकृतीपत्र मिळाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराला हे काम अवघ्या 130 आठवड्यात पूर्ण करायचे आहे.
या मेट्रो मार्गावर चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्तीशक्ती चौक हे 4 मेट्रो स्थानक तयार केले जाणार आहेत. यामुळे या संबंधित भागाला आता मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. परिणामी तेथील नागरिकांचा प्रवास हा आधीच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे.