Pune News : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. राज्यात महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला जात आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी देखील महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झालेली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मुरलीधर मोहोळ हे मैदानात आहेत. दरम्यान मोहोळ यांनी एका प्रचार सभेत पुण्यात होऊ घातलेल्या मेट्रो मार्गांची माहिती दिली आहे.
आगामी काळात पुण्यात कोणकोणत्या मार्गांवर मेट्रो धावणार या संदर्भात मोहोळ यांनी माहिती दिली असून मेट्रो मार्गांच्या जाळ्यामुळे सांस्कृतिक राजधानी मधील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
खरे तर सध्या स्थितीला पुणे शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज-रुबी हॉल क्लिनिक- रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. सिविल कोर्ट ते स्वारगेट या विस्तारित भूमिगत मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू आहे.
हा मार्ग जून महिन्याच्या मध्यापर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची आशा आहे. याशिवाय पुणे महानगर प्रदेश विभाग प्राधिकरणाच्या माध्यमातून शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे.
दरम्यान महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी स्वारगेट ते कात्रज ५.४ किमी, पिंपरी ते निगडी ४.४ किमी, वनाज ते चांदणी चौक १.५ किमी, रामवाडी ते वाघोली १२ किमी, हडपसर ते खराडी ५ किमी, स्वारगेट ते हडपसर ७ किमी, स्वारगेट ते खडकवासला १३ किमी आणि एसएनडीटी ते वारजे ८ किमी या मार्गांवर नजीकच्या भविष्यात मेट्रो सुरु होणार असल्याची माहिती दिली आहे.
यामुळे पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आधीच्या तुलनेत अधिक सक्षम होणार आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.