Pune News : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आता अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे मोर्चा काढला आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील बांधव सहभागी होत आहे. हा मोर्चा आपल्या पुण्यात दोन दिवसांसाठी राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या अर्थातच 23 जानेवारी 2024 ला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा मोर्चा रांजणगाव येथून कोरेगाव पार्क मार्गे खराडी येथे मुक्कामाला येणार आहे. तसेच 24 जानेवारीला हा मोर्चा पिंपरी-चिंचवड मार्गे लोणावळा येथे जाणार आहे. यावेळी या मोर्चात हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
त्यामुळे साहजिकच मोर्चा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे. परिणामी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत महत्त्वाचा बदल केला जाणार आहे. या संदर्भात पुण्याच्या वाहतूक पोलीस आयुक्तांनी पुण्याच्या वाहतुकीत झालेल्या बदलाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
या संदर्भात आयुक्तांच्या माध्यमातून एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित झाले आहे. दरम्यान मोर्चा पुण्यातून पुढे रवाना झाल्यानंतर वाहतूक पुन्हा एकदा पूर्व पदावर आणली जाणार आहे. यामुळे संबंधित बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. उद्या 23 जानेवारी दुपारी तीन वाजेपासून अहमदनगर कडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक वळवली जाणार आहे.
23 तारखेला होणारा वाहतुकीतील बदल
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन तसेच कोल्हापूर, सातारा येथुन अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज खडी मशिन चौक मंतरवाडी फाटा हडपसर मार्गे सोलापूर रोडने केडगांव चौफुला – नाव्हरे- शिरुर मार्गे वळवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतलेला आहे.
तसेच वाघोली, लोणीकंद मार्गे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक थेऊर फाटा (सोलापूर रोड) येथुन केडगांव चौफुला नाव्हरा मार्गे शिरुर ते अहमदनगरकडे वळवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय, पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक खराडी बायपास उजवीकडे वळण घेवून मगरपट्टा चौक – डावीकडे वळण घेवून सोलापूर रोडने यवत केडगांव चौफुला – नाव्हरे – शिरुर मार्गे वळवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांच्या माध्यमातून यावेळी समोर आली आहे.
24 तारखेला होणारा वाहतुकीतील बदल
परवा अर्थातच 24 जानेवारीला अहमदनगर कडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथुन केसनंद थेऊर मार्गे सोलापूर रोड अशी वळवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच वाघोली परिसरामधील वाहने वाघोली आव्हाळयाडी मांजरी खुर्द मांजरी बुद्रुक – केशवनगर – मुंढवा चौकाकडे जातील आणि मग तेथून पुढील प्रवास करतील.
याशिवाय पुणे शहरामधुन अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चंद्रमा चौकातून आळंदी रोड जंक्शन, विश्रांतवाडी धानोरी लोहगाव वाघोली मार्गे अहमदनगरकडे अशी वळविण्यात येईल.