Pune News : पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. पुणे शहराचा आणि जिल्ह्याचा गेल्या काही वर्षांमध्ये मोठा विस्तार झाला आहे. यामुळे जिल्ह्यात वेगवेगळे रस्ते विकासाची, रेल्वे विकासाची तसेच इतर महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
अलीकडे जिल्ह्यातील लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे, वाढत्या शहरीकरणामुळे, औद्योगिकीकरणामुळे आता याचा प्रशासनावर मोठा ताण येत असल्याचे चित्र आहे.
खरे तर सध्या स्थितीला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका स्थापित करण्यात आलेल्या आहेत. मात्र जिल्ह्याचा वेगाने होत असलेला विकास पाहता आता जिल्ह्यात नवीन तिसरी महापालिका तयार होणार असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश झालेला आहे. अर्थातच महापालिकांची हद्द वाढ झालेली आहे.
यामुळे या दोन्ही महापालिकांमध्ये आता नवीन गावांचा समावेश करणे त्या संबंधित गावांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य होणार नाही असे सांगितले जात आहे.
हेच कारण आहे की, आता पुणे जिल्ह्यात नवीन महापालिका तयार होणार आहे. खरेतर पुणे जिल्ह्यात चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरुनगर नगरपरिषद तसेच त्यांच्या आजूबाजूच्या गावांची एक नवीन महापालिका तयार करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान चाकण, आळंदी व राजगुरुनगर नगरपरिषद तसेच आजूबाजूच्या गावांची एक नवीन महापालिका तयार करणे शासनाच्या विचाराधीन असल्याचे वृत्त समोर आले आहे.
या नवीन महापालिका तयार करण्याबाबतचा सविस्तर असा अहवाल देखील शास्त्राच्या माध्यमातून मागितला गेला आहे. यामुळे लवकरच पुणे जिल्ह्यात तिसरी महापालिका तयार होणार अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात तिसरी महापालिका तयार करण्याबाबतचा विभागीय आयुक्ता सौरभ राव यांच्याकडे अभिप्रायासह अहवाल मागितला गेला आहे. यामुळे लवकरच जिल्ह्यात तिसरी महापालिका तयार होणार असा दावा आता होऊ लागला आहे.
निश्चितच जिल्ह्यात जर नवीन महापालिका तयार झाली तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर भविष्यात ताण येणार नाही आणि यामुळे जिल्ह्यातील एकात्मिक विकासाला गती मिळेल अशी आशा आहे.