Pune News : पुण्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा देण्यात आलेला आहे. या शहराला लाभलेले ऐतिहासिक महत्त्व पाहता आणि हे शहर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवत असल्याने याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. हे शहर आऊसाहेब जिजाऊ अन छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे.
छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी राजे यांच्या काळापासून तर पेशवाईच्या काळापर्यंत पुणे हा महत्त्वाचा मुलुक राहिला आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का आपल्या पुण्याला महाभारताचा देखील इतिहास लाभला आहे.
महाभारत काळात पांडवांनी पुण्यात वास्तव्य केले असल्याचे सांगितले जात आहे. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही मात्र ज्या ठिकाणी पांडवांनी वास्तव्य केले आहे ते पुण्यातील ठिकाण आज खूपच वेल डेव्हलप ठिकाण म्हणून ओळखले जाते.
पुण्यातील या भागाचा काळाच्या ओघात चांगला विकास झाला आहे. येथे उंचच-उंच इमारती डेव्हलप झाल्या आहेत. या भागात शहरीकरण, नागरीकरण, औद्योगिकीकरण वाढले आहे.
खरे तर आम्ही ज्या भागाविषयी बोलत आहोत तो आहे बाणेरचा भाग. असं सांगितलं जातं की, बाणेरमध्ये पांडवांचे वास्तव्य होते. आता तुम्ही म्हणाल हे कस काय, याचा काय पुरावा आहे? तर, आम्ही आपणास सांगू इच्छितो की बाणेरमध्ये पांडवकालीन लेण्या आहेत.
या पांडवकालीन लेण्यांवरून बाणेर परिसरात पांडवांचे अस्तित्व होते हे स्पष्ट होते. विशेष म्हणजे बाणेरला रामायण काळाशी देखील जोडले जाते. असं म्हणतात की बाणेर येथे प्रभू श्री रामरायांनी एका दानवाचा अंत केला होता.
प्रभू रामरायांनी ज्या दानवाचा अंत केला त्याचं नाव होतं बाणासुर. दरम्यान याच दानवाच्या नावावरून या गावाला बाणेर असे नाव पडले होते. आज बाणेर वेल डेव्हलप झालेले आहे मात्र या बाणेरला पांडवकालीन आणि रामायणकालीन इतिहास लाभला आहे.
बाणेरमधून राम नावाची नदी वाहते आणि यावरून हे देखील अधोरेखित होते की या गावाचा रामायणाशी संबंध आहे. बाणेरमधील पांडवकालीन बानेश्वर लेणी बाबत बोलायचं झालं तर यात तीन गुहा आहेत. यातील एक गुहा बंद आहे.
तसेच ज्या दोन गुहा सुरू आहेत त्यातील एका गुहेत म्हणजे डावीकडील गुहेत पाण्याचे कुंड आहे. हे पाण्याचे कुंड पार्थने अर्थातच अर्जुनाने बाण मारून तयार केले असल्याचा दावा केला जातो.
महाभारतात पांडव १२ वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात होते असे म्हटले गेले आहे. दरम्यान याच तेरा वर्षांच्या काळातील काही काळ त्यांनी या बाणेरमध्ये घालवला असल्याचे म्हटले जात आहे.