Pune News : महाराष्ट्रात अनेक थंड हवेची ठिकाणे आहेत. यामध्ये लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सर्वात जास्त लोकप्रिय आहे असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. लोणावळ्यात दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक हजेरी लावत असतात. यामध्ये राज्यातून तसेच देशातील कानाकोपऱ्यातून आणि विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचा देखील समावेश आहे.

संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेले हे थंड हवेचे ठिकाण आता मात्र कात टाकणार आहे. या थंड हवेच्या ठिकाणाला आता नवीन रूप मिळणार आहे. लोणावळ्याजवळील टायगर पॉईंट आणि लायन पॉईंट पर्यटन स्थळ विकासाच्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या निधीला नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता या थंड हवेच्या ठिकाणाचे वैभव आणखी वाढणार आहे.

या प्रकल्पामुळे लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांची गर्दी आणखी वाढेल अशी शक्यता देखील आहे. यामुळे येथील पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे. परिणामी परिसरातील एकात्मिक विकास सुनिश्चित होणार आहे. कुरवंडे गावाजवळ असलेल्या टायगर आणि लायन पॉइंट हे पर्यटन ठिकाण आता कात टाकणार आहे.

या ठिकाणी आता सर्व अत्यावश्यक सोयी सुविधा देखील उपलब्ध होणार आहेत. तसेच स्कायवॉक देखील तयार होणार आहे. दरम्यान या पर्यटनस्थळ विकासाच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच पीएमआरडीएने या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे.

विशेष म्हणजे या प्रस्तावाला नुकतीच जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली आहे. तसेच दोन ते तीन दिवसांपूर्वी हा प्रकल्प उच्चाधिकारी समितीकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. आता उच्चाधिकार समितीने देखील या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे.

त्यामुळे हा जवळपास 33 कोटी रुपयांचा प्रकल्प पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आता लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण जागतिक दर्जाचे टुरिस्ट प्लेस म्हणून उदयास येईल असा आशावाद व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प फक्त तीन वर्षात पूर्ण होणार आहे.

मावळचे लोकप्रिय आमदार सुनील आण्णा शेळके यांनी याचे काम सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांच्या काळात हा संपूर्ण प्रकल्प बांधून तयार होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. आता आपण या प्रकल्पांतर्गत कोणकोणती कामे केली जातील याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

टायगर पॉइंट : या प्रकल्पांतर्गत टायगर पॉईंट येथे स्काय वॉक विकसित केला जाणार आहे. याची लांबी १२५ मीटर एवढी राहील आणि रुंदी सहा मीटर एवढी राहणार आहे. शिवाय येथे एक हजार व्यक्तींसाठी अॅम्पी थिएटर बनवले जाणार आहे. प्रकाश व ध्वनी शो, लहान मुलांना खेळण्याची जागा, प्रवेशद्वार व तिकीट घर, रस्ता रुंदीकरण – ४५ मीटर, वाहनतळ – एकूण १५०० कार + दोन हजार स्कूटर, २० चौरस मीटर क्षेत्रफळाचे २४ गझिबो तयार केले जाणार आहे.

शिवाय येथे १२५ मी. लांबीची झिप लाइन, बंजी जम्पिंग, वॉल क्लाइंबिग, फेरीस व्हील यांसारखे साहसी खेळ देखील विकसित केले जाणार आहेत.

लायन पॉइंट : लायन्स व टायगर पॉइंट दरीवर ९० मीटर लांब आणि ६ मीटर रुंद पूल तयार केला जाणार आहे.  येथे प्रवेशद्वार व तिकीट घर तयार होणार आहे. तसेच चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर फूड पार्क इमारत, स्मरणिका दुकाने, प्रशासकीय इमारत, रुफ टॉप कॅफे, व्हुइंग डेक विकसित केले जाणार आहे.

येथे स्वच्छतागृह तयार होणार आहे. येथील रस्ते 45 मीटर पर्यंत रुंद केले जाणार आहेत. वाहनतळ विकसित केले जाईल, हे वाहनतळ ३०० कार + २५० स्कूटर क्षमतेचे राहणार आहे. तसेच २० चौरस मीटर क्षेत्रफळाचे १२ गझिबो आणि आवश्यक विद्युत रोषणाई व उंच दिवे बसवले जाणार आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *