Pune News : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास जगासमोर मांडण्यासाठी पुण्यात एक थीम पार्क तयार केले जात आहे. नवीन पिढीला दिशा दाखवणारा हा इतिहास थीम पार्कच्या माध्यमातून जगासमोर मांडला जाणार आहे.
पद्मविभूषण दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून हा थीम पार्क तयार केला जात आहे. हे भव्य दिव्य थीम पार्क शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथे तयार केले जाते.
हे थीमपार्क शिवप्रभूंच्या गौरवशाली इतिहासाला दाखवणारे राहणार आहे. खरे तर, हे ऐतिहासिक थीम पार्क साकारत असतांना आतापर्यंत अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
पण नुकतीच शिवप्रभूंच्या या शिवसृष्टीसाठी गुजरात सरकारकडून मदत प्राप्त झाली आहे. गुजरात सरकारने या शिवसृष्टीसाठी पाच कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
त्यामुळे आदर्श राजा प्रभू शिवछत्रपती यांचे हे भव्य दिव्य थीम पार्क लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे. शिवसृष्टीच्या कामाला यामुळे हातभार लागणार आहे.
खरे तर शिवसृष्टीचे काम जलद गतीने व्हावे अशी तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. यामुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील शिवभक्तांसाठी या शिवसृष्टीचे काम जलद गतीने पूर्ण केले जात आहे.
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांनी ही देणगी स्वीकारली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शिवसृष्टीसाठी मदत करण्याची इच्छा आधीच बोलून दाखवली होती.
यानुसार आता मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील या ऐतिहासिक थीम पार्कला देणगी स्वरूपात पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी आज अर्थातच 28 डिसेंबर 2023 रोजी हा निधी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
यावेळी कुबेर यांनी पटेल यांना शिवप्रभूंच्या या शिवसृष्टीची सविस्तर माहिती देखील दिली आहे. तसेच शिवसृष्टीला एकदा भेट द्या असे आग्रहाचे निमंत्रण देखील मुख्यमंत्री महोदय यांना देण्यात आले आहे.