Pune News : पुणे आणि मुंबई ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे आहेत. पुणे आयटी हब आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते तर मुंबई राज्याची राजधानी आणि एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जाते. अशा परिस्थितीत या दोन्ही मेट्रो शहरांत रोजाना राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच देशभरातून नागरिक कामानिमित्त जातात.
मराठवाड्यातून देखील हजारो नागरिक पुणे आणि मुंबईमध्ये जातात. दरम्यान मराठवाड्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता मराठवाड्यातून मुंबईला जाण्यासाठी एक नवीन मार्ग तयार केला जाणार आहे. मराठवाड्यातून मुंबईमध्ये जाण्यासाठी प्रवासी पुणे मार्गे जातात.
यामुळे मात्र अहमदनगर-पुणे-चाकण महामार्गावर मोठी गर्दी होते. पुणे शहरातही यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या परिस्थितीत ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी, महामार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबईकडे जलद गतीने पोहोचता यावे यासाठी शिरूर-खेड-कर्जत असा नवीन मार्ग तयार केला जाणार आहे.
या मार्गामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना तसेच शिरूर मधील प्रवाशांना मुंबईकडे प्रवास करताना नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे. अर्थातच या मार्गामुळे पुण्यात येणारी वाहतूक शिरूर-खेड मार्गे थेट कर्जतला रवाना होणार आहे. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे तसेच पुणे मुंबई महामार्गावरील वाहतुकीचा ताण आपोआप कमी होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
नवीन मार्गाची गरज काय?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या मराठवाडा आणि विदर्भ या विभागातील प्रवाशांना पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई यांसारख्या महानगरात जाण्यासाठी शिरूर-चाकण-शिक्रापूर-तळेगाव मार्गे जावे लागते. मात्र चाकण औद्योगिक वसाहतीमुळे नगर रस्त्यावर कायमच वाहतूक कोंडी राहते.
परिणामी मराठवाड्यातील आणि विदर्भातील प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा फटका बसतो. म्हणून नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि मराठवाड्यातील आणि विदर्भातील प्रवाशांना मुंबईकडील प्रवास सुसाट व्हावा या हेतूने वाघोली ते शिरूर दरम्यान उड्डाणपूल तयार करण्याचा किंवा शिरूर मार्गे थेट कर्जत कडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
यामध्ये, शिरूर-खेड-कर्जत असा नवीन मार्ग तयार करण्याच्या प्रस्तावावर आता विचार सुरू झाला आहे. याचा प्रस्ताव देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्य शासनाकडे सादर झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थातच, या दोन पर्यायांपैकी शिरूर-खेड-कर्जत या मार्गाच्या पर्यायाचा विचार सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.
नवीन मार्गाचा संपूर्ण रूटमॅप
शिरूर खेड कर्जत हा 135 किलोमीटरचा मार्ग राहणार आहे. मावळ, खेड आणि शिरूर या तीन तालुक्यातून हा मार्ग प्रस्तावित राहणार आहे. शिरूर-पाबळ-राजगुरुनगर (खेड)- शिरवली-पाईट-वांद्रे-कर्जत असा हा नवीन मार्ग राहणार असून हा मार्ग पुढे पनवेल-उरणला जोडला जाणार आहे. हा मार्ग एकूण दोन टप्प्यात बांधला जाणार असून पहिल्या टप्प्यात 60 किलोमीटरचा मार्ग तयार होईल आणि दुसऱ्या टप्प्यात 80 किलोमीटरचा मार्ग बांधला जाणार आहे.