Pune News : पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे या काही मोजक्याच शहरात मेट्रो सुरू झाली आहे. दरम्यान या शहरातील मेट्रो मार्ग विस्तारण्याचे काम सध्या स्थितीला सुरु आहे.

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचा अर्थातच पुण्याचा विचार केला असता सध्या स्थितीला पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर मेट्रो सुरू आहे.

मात्र या दोन्ही मेट्रो मार्गांचे विस्तारित टप्पे अजूनही सुरू झालेले नाहीत. सिविल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हे विस्तारित मेट्रो मार्ग केव्हा सुरू होणार हा सवाल पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

खरे तर सध्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गाचे काम सुरू आहे. हा संपूर्ण मार्ग भूमिगत असल्याने याच्या कामाला थोडा उशीर होणार हे स्पष्ट होत आहे.

मात्र रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले असून या मेट्रो मार्गाची तपासणी देखील पूर्ण झाली आहे. या मेट्रो मार्गाची सुरुवातीला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या एका डेलिगेटकडून पाहणी करण्यात आली.

यानंतर स्वतः मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी या मार्गात काही त्रुटी सांगितल्या. दरम्यान महा मेट्रोने आयुक्त यांनी सांगितलेल्या त्रुटी दूर केल्यात आणि नंतर सुधारित अहवाल मंजुरीसाठी पाठवला.

दरम्यान याच महामेट्रोच्या सुधारित अहवालास सीएमआरएस म्हणजे रेल्वे सुरक्षा आयुक्त यांच्याकडून नुकतीच परवानगी प्राप्त झाल्याची माहिती मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

म्हणजेच आता राज्य शासनाने महा मेट्रोला आदेश दिल्यानंतर लगेचच या मार्गावर मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

परंतु हा मेट्रो मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झाला पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वेळ मिळाल्यानंतर हा मेट्रो मार्ग सुरू होणार आहे.

दुसरीकडे मात्र सर्वसामान्य पुणेकरांच्या माध्यमातून शहरात होणारी वाहतूक कोंडी पहाता लवकरात लवकर हा मेट्रोमार्ग सुरू केला पाहिजे अशी मागणी केली जात आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *