Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या मेट्रो संदर्भात आहे. खरे तर सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गावर मेट्रो सुरू आहे.
विशेष म्हणजे सिविल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लीनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गांचे काम देखील पूर्ण झाले आहे.
या मार्गापैकी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गावर चाचणी गेल्या वर्षी पूर्ण करण्यात आली असून नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या माध्यमातून या मार्गाची पाहणी देखील पूर्ण करण्यात आली आहे.
त्यामुळे येत्या काही दिवसात या मार्गावर मेट्रो धावणार आहे. अर्थातच येत्या काही दिवसात वनाज ते रामवाडी या संपूर्ण 16 किलोमीटरच्या अंतरावर मेट्रो धावणार आहे.
दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट या 17 किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट हा मार्ग सध्या स्थितीला वाहतुकीसाठी सुरू आहे.
तसेच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या 3.64 किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गाचे काम देखील पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या 3.64 किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गावर नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
ही मेट्रो मुठा नदीच्या पात्राखालून पहिल्यांदाच धावली आहे. या मार्गावरील मेट्रोची चाचणी पूर्ण झाली असल्याने हा भुयारी मेट्रो मार्ग येत्या दोन महिन्यात वाहतुकीसाठी सुरू होणार असा दावा प्रसारमाध्यमांमध्ये केला जात आहे.
या भुयारी मेट्रो मार्ग प्रकल्पाचे काम सप्टेंबर 2020 मध्ये सुरू झाले. त्यामुळे पिंपरी चिंचवड येथील नागरिकांना पुणे शहरात सहजतेने पोहोचता येणार आहे.
दरम्यान या भुयारी मेट्रो मार्गाची चाचणी पूर्ण झाली असल्याने आता या मार्गावर मेट्रो केव्हा धावणार हाच मोठा सवाल पुणेकरांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे, मीडिया रिपोर्ट्स मध्ये हा भुयारी मेट्रो मार्ग येत्या दोन महिन्यात सुरु होऊ शकतो असा दावा होत आहे.