Pune News : पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. या शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. अलीकडे या शहरात विविध आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामुळे पुणे शहर आयटी हब म्हणून नावारूपाला येऊ लागले आहे.
या शहरात शिक्षणासाठी, उद्योगासाठी, रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या ही खूपच अधिक आहे. खरंतर राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे शहर आता तणावात आले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर आणि इतर पायाभूत सुविधेवर मोठा तणाव पाहायला मिळत आहे.
अशातच मात्र पुण्यासंदर्भात एक नवीन आणि अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात उच्च रक्तदाबाचे सर्वाधिक पुरुष रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. या खालोखाल नासिक आणि ठाणे जिल्ह्याचा नंबर लागतो.
सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच याबाबत एक सर्वे केला होता या सर्वेतून ही बाब उघडकीस आली आहे. निरोगी तरुणाई, वैभव महाराष्ट्राचे ही मोहीम सार्वजनिक आरोग्य विभागाने राबवली आणि या मोहिमेतूनच पुणे जिल्ह्यात सर्वाधिक उच्च रक्तदाबाचे पुरुष रुग्ण असल्याचे आढळले आहे.
विशेष म्हणजे मधुमेहाचे रुग्ण देखील पुण्यातच सर्वाधिक आढळून आले आहेत. गेल्या वर्षी 17 सप्टेंबर पासून ही मोहीम सुरू करण्यात आली होती. यामध्ये राज्यातील अठरा वर्षांवरील पुरुषांची तपासणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अजूनही ही मोहीम सुरूच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत महाराष्ट्रातील २ कोटी ७९ लाख ९९ हजार २९० पुरुषांची तपासणी पूर्ण करण्यात आली. त्यातील २ कोटी ६८ लाख ९७ हजार ३७४ जणांच्या आरोग्य तपासणीसोबत ईसीजी, सिटी स्कॅन आणि एक्स रे आदी चाचण्या करण्यात आल्या आहेत.
या मोहिमेतून समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 38 लाख 7356 तरुणांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. यातील सर्वाधिक म्हणजेच ५ लाख ७१ हजार १७९ रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील होते. तसेच राज्यात मधुमेहाचे ४ लाख ६७ हजार रुग्ण आढळले असून, त्यात सर्वाधिक ३७ हजार रुग्ण पुण्यातील आहेत.
अशा परिस्थितीत, आता आपण पुणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असलेल्या उच्च रक्तदाबाचे आणि मधुमेहाचे नेमके कारक काय आहे हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कारणे काय ?
तज्ञ लोकांनी सांगितल्याप्रमाणे अनुवांशिकतेमुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब हा रोग भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. याशिवाय भारतीयांच्या जीवन शैलीत मोठा बदल झाला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाल मंदावली असून, कामाची पद्धत देखील आता बैठी बनली आहे.
तसेच आहारात गोड, पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक झाल्याने अन प्रथिनयुक्त पदार्थाचे सेवन कमी झाल्याने हे आजार आता वाढू लागले आहेत. सोबतच आहारामध्ये आता जंक फूड आणि फास्ट फूडचे प्रमाणही वाढले आहे, यामुळे देखील या आजारात मोठी वाढ होत आहे.