Pune News : पुणे शहरातील रस्ते आणि रेल्वेमार्ग मजबूत करण्यासाठी गेल्या काही वर्षात शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धस्तरावर प्रयत्न झाले आहेत. रस्ते मार्ग मजबूत व्हावेत यासाठी पीएमआरडीए म्हणजेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून देखील एका महत्त्वाच्या रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय मेट्रोचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दोन मेट्रो मार्ग अंशता सुरू झाले आहेत.
खरे तर पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी यादरम्यान मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी हे दोन्ही मार्ग अंशतः सुरू देखील झालेले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लीनिक यादरम्यान मेट्रोची सेवा सुरू झालेली आहे.
मात्र पुणेकरांच्या माध्यमातून सिविल कोर्ट ते स्वारगेट हा भुयारी मार्ग आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग केव्हा सुरू होणार असा सवाल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित केला जात आहे. दरम्यान या दोन मेट्रो मार्गांपैकी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रोमार्गासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट नुकतीच समोर आली आहे.
पुणे मेट्रोचा रुबी हॉल ते रामवाडी हा विस्तारित मार्ग कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. कारण की, या मार्गावरील काम पूर्ण झाले असून येत्या आठवड्याभरात रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे एक पथक या मार्गाची पाहणी करण्यासाठी पुण्यात दाखल होणार आहे.
हे पथक दाखल झाल्यानंतर या मेट्रो मार्गाची जवळपास एक आठवडा तपासणी करणार आहे. महामेट्रो प्राधिकरणाने सुरुवातीला विस्तारित रुबी हॉल ते रामवाडी मार्गावरील काम मागील वर्षाच्या अखेरीस सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.
तथापि, या मेट्रो मार्गाच्या कामाला उशीर झाल्याने आणि मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरू असलेल्या तपासण्या आणि मंजुरी आवश्यक असल्याने, गेल्या वर्षाच्या अखेरीस हा मार्ग सुरू होऊ शकला नाही. पण आता या वर्षाच्या सुरुवातीस प्रक्षेपण पुन्हा शेड्यूल करण्यात आले आहे.
तपासणी पथक विस्तारित मार्गाची आता कसून छाननी करण्यासाठी सज्ज झाले असून, त्यानंतरचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे. या पथकाचा अहवाल आयुक्तांकडे सादर झाल्यानंतर आयुक्त स्वतः या मार्गाची पाहणी करतील असे देखील सांगितले जातात.
म्हणजे पथकाची पाहणी आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांची पाहणी झाल्यानंतर या मार्गाला हिरवा झेंडा दाखवला जाईल. यानंतर मग महा मेट्रोच्या माध्यमातून सदर मेट्रो मार्ग सुरू करण्यासाठी राज्य शासनाला विनंती केली जाईल.
मग राज्य शासन हा मार्ग केव्हा सुरू करायचा याबाबतचा अंतिम निर्णय घेईल असे बोलले जात आहे. दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये हा मार्ग मार्च 2024 अखेरपर्यंत पुणेकरांच्या सेवेत दाखल होऊ शकतो असा दावा केला जात आहे. यामुळे आता मार्च 2024 पर्यंत हा मार्ग सुरू होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.