Pune News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 40 ते 42 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातही तापमान मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे असह्य ऊकाड्याचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमान 43° c पर्यंत पोहोचले असून याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक धरणांमधला पाण्याचा साठा वेगाने घटत चालला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तापमानात जलद गतीने वाढ होत असल्याने बाष्पीभवन वेगाने होत आहे आणि यामुळे धरणांमधील पाण्याचा साठा कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा विभागातील धरणांमधील पाण्याचा साठा हा जलद गतीने कमी होत आहे.

याशिवाय पुणे विभागातील धरणांमधील पाण्याचा साठा देखील गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने जलद गतीने कमी होऊ लागला आहे. यामुळे नजीकच्या भविष्यात पुणे जिल्ह्यात देखील पाण्याचे टंचाई पाहायला मिळू शकते.

आगामी काळात पाण्याचा शॉर्टेज होऊ शकतो आणि यामुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकांना तर याचा फटका बसणारच आहे. शिवाय तीव्र पाणीटंचाई झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे आणि पशुधनाच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येणार अशी भीती व्यक्त होत आहे.

अशा परिस्थितीत आता आपण पुणे जिल्ह्यातील कोणत्या धरणात किती पाण्याचा साठा शिल्लक आहे याबाबत जलसंपदा विभागाने दिलेली आकडेवारी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये किती पाणी शिल्लक आहे

भाटघर धरण : भाटघर धरण हे जिल्ह्यातील सर्वाधिक पाण्याची क्षमता असणारे धरण आहे. या धरणात मात्र 10.47% एवढेच पाणी शिल्लक राहिले आहे. या धरणात 2.46 टीएमसी एवढे पाणी उपलब्ध आहे.

नीरा देवघर धरण : जिल्ह्यातील हे आणखी एक महत्त्वाचे धरण. या धरणात देखील पाण्याचा साठा हा जलद गतीने कमी होत आहे. येथे फक्त ४७.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून प्राप्त झाली आहे.

डिंभे धरण : जिल्ह्यातील डिंभे धरणाचा पाण्याचा साठा देखील कमी झाला आहे. या धरणात फक्त २३.३४ टक्के पाणी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.

चाकसमान धरण : चाकसमान धरणात सध्या 19.40% एवढे पाणी शिल्लक आहे. यामुळे या धरण क्षेत्र परिसरात आगामी काळात पाण्याची टंचाई जाणवू शकते अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.

पवना धरण : जिल्ह्यातील पवना धरणात देखील पाण्याचा साठा कमी झाला आहे. पवनामध्ये सध्या 31.70% एवढे पाणी शिल्लक असल्याची आकडेवारी जलसंपदा विभागाने जारी केली आहे.

खडकवासला धरण : पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या धरणांमध्ये खडकवासला धरणाचा देखील समावेश होतो. या धरणात सध्या 53.57% एवढे पाणी शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे.

पानशेत धरण : जिल्ह्यातील पानशेत धरण क्षेत्रातील नागरिकांची देखील चिंता वाढवणारी बातमी आहे. जलसंपदा विभागाकडून समोर आलेल्या आकडेवारीनुसार या धरणातील पाण्याचा साठा जलद गतीने कमी होत आहे. सध्या या धरणात ३०.२९ टक्के पाणी शिल्लक आहे.

मुळशीटाटा धरण : या धरण प्रकल्पातील पाण्याचा साठा देखील जलद गतीने कमी होत असून सध्या स्थितीला या धरणात फक्त आणि फक्त ३३.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने जारी केली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *