Pune News : पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. फक्त पुणेकरांसाठीच नाही तर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे.
कारण की, नुकत्याच दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवरायांनी तयार केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या दोन राजधान्या रस्ते मार्गाने परस्परांना कनेक्ट करण्यासाठी एका नवीन महामार्गाची पायाभरणी करण्यात आलेली आहे.
हिंदवी स्वराज्याचे राजधानी राजगड व रायगड या दोन राजधान्या या नवीन तयार होणाऱ्या महामार्गामुळे परस्परांना जोडल्या जाणार आहेत.
यामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी तिसरा पर्याय मार्ग उपलब्ध होणार आहे. खरे तर पुण्याहून कोकणात लाखो पर्यटक फिरण्यासाठी निघतात. तसेच कोकणातील ही लाखो नागरिक पुण्याकडे येत असतात.
अशा परिस्थितीत हा पुणे आणि रायगड जिल्हा परस्परांना जोडणारा नवीन महामार्ग विशेष फायदेशीर ठरणार आणि यामुळे राज्याच्या एकात्मिक विकासात हातभार लागणार असा आशावाद व्यक्त होत आहे.
कसा असेल महामार्ग ?
मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या भोर्डे ते महाड येथील शेवते घाट दरम्यानच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
9 जानेवारी 2024 ला या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून जलद गतीने हा रस्ता पूर्ण होईल अशी आशा आहे. या मार्गासाठी शासनाने 30 कोटी रुपयांना मंजुरी दिलेली आहे.
यामुळे मार्गासाठी निधीची देखील चनचन भासणार नाही अशी आशा आहे. हा मार्ग एकूण 13 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 25 कोटी 32 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच हिवाळी अधिवेशनात या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. या रस्त्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी विशेष प्रयत्न केलेले होते.
यामुळे थोपटे यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे. या रस्त्याच्या कामाला आता सुरुवात झाली असल्याने आमदार संग्राम यांच्या पुढाकाराला खऱ्या अर्थाने यश आले असल्याचे बोलले जात आहे.