Pune News : सर्वसामान्य नागरिकांसाठी शासन वेगवेगळ्या योजना चालवत असते. राज्यातील सर्वसामान्यांसाठी देखील शासनाने अनेक कौतुकास्पद योजना सुरू केल्या आहेत. ज्या लोकांना घर नाही अशा बेघर लोकांसाठी देखील शासनाने विविध घरकुल योजना देखील सुरू केल्या आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास योजना अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शबरी आवास योजना, भटक्या विमुक्त प्रवर्गातील नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना याशिवाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देखील सर्वसामान्यांना घरकुल उपलब्ध करून दिली जात आहेत.
खरे तर आत्तापर्यंत राज्यात ओबीसी प्रवर्गातील बेघर असलेल्या नागरिकांसाठी एकही घरकुल योजना सुरू झालेली नव्हती. मात्र आता ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी देखील घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे.
मोदी आवास योजना असे या योजनेचे नाव आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील बेघर नागरिकांना पुणे जिल्हा परिषदेने मोठा दिलासा दिला आहे.
पुणे जिल्ह्यातील हजारो बेघर नागरिकांसाठी घरकुल मंजूर झाले आहे. यामुळे या हजारो नागरिकांना आता त्यांचे हक्काचे घर उपलब्ध होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेने 1867 घरकुल मंजूर केले आहेत. हे घरे मोदी आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत संबंधित लाभार्थ्यांसाठी मंजूर झाली आहेत.
मोदी आवास योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी 865 घरे मंजूर झाली आहेत तर रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी १००२ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजूर झालेल्या घरकुलांचे काम त्वरित करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत.
यामुळे या बेघर लोकांना आता लवकरच त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे. मोदी आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजुरी दिली आहे.
तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने रमाई आवास योजना अंतर्गत येणाऱ्या घरांना मंजुरी दिली आहे.