Pune News : पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरेतर पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या विकासाची कामे प्रस्तावित आहेत. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या कामांना शासनाच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून गती देण्यात आली आहे.
आतापर्यंत शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर काही प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आले आहेत.
शहरातील आणि जिल्ह्यातील रस्ते वाहतूक सुधारित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या अनेक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे तर काही प्रकल्पांचे काम येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोडचे देखील काम हाती घेण्यात आले आहे.
अशातच आता हाती घेण्यात आलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर ५४८-डी या राष्ट्रीय महामार्गासह पुणे ते शिरुर आणि नाशिक फाटा ते खेड या उन्नत मार्गांच्या कामासाठी देखील निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यामुळे या संबंधित मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मार्गावर होणारे वाहतूक कोंडी आणि अपघात बऱ्यापैकी नियंत्रणात येतील असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे.
पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात छोट्या-मोठ्या अवजड वाहनांची आणि हलक्या वाहणाची प्रचंड रहदारी असते. परिणामी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
आता मात्र ही वाहतूक कोंडी सुटणार आहे. खरतर या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल एका त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून तयार झाला होता. यानंतर या डीपीआरला मंजुरी मिळाली.
आता या प्रकल्पासाठी निविदा देखील प्रसिद्ध झाली आहे. डिसेंबर 2023 पासून निविदा प्रक्रिया सुरू झाली असून 7 फेब्रुवारी 2024 पर्यंत यासाठी निविदा सादर करता येणार आहेत.
अस्तित्वातील तळेगाव-चाकण टप्प्यातील २५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्वावर चौपदरीकरण करुन त्यावर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याच्या कामाची २,४५५.७८ कोटी रुपयांची आणि चाकण ते शिक्रापूर टप्प्यातील २८ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्वावर चौपदरीकरण करुन त्यावर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याच्या कामाची २,७७८.५३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निविदा सादर करता येणार नाही. यामुळे प्रकल्पाचे काम फेब्रुवारीनंतर नवीन वर्षात सुरू होऊ शकते असा दावा केला जात आहे.