Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे रिंग रोड हा महत्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. शिक्षणाचे माहेरघर पुणे, आयटी कंपन्यांचे माहेरघर पुणे, सांस्कृतिक ची राजधानी पुणे अलीकडे वाहतूक कोंडीमुळे अडचणीत आली आहे.
शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. हेच कारण आहे की आता राज्य रस्ते विकास महामंडळाने हा प्रकल्प हाती घेतलेला आहे. दरम्यान या प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.
खरंतर या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात काम पूर्ण होणार आहे. यानुसार पश्चिम भागातील भूसंपादन आता जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.
दुसरीकडे पूर्व भागातील भूसंपादनाबाबत देखील महत्त्वाची घडामोड घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूर्व भागातील जमिनीसाठीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
पूर्व भागातील काही गावांमधील जमिनीचे दर निश्चित झाले असल्याने आता लवकरच उर्वरित गावांमधील जमिनीचे दर देखील अंतिम होतील आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल अशी आशा आहे.
भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर जमिनी ताब्यात घेतल्या जातील आणि प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. पूर्व भागातील रिंग रोड मध्ये मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधील 46 गावांचा समावेश होतो.
दरम्यान काल यापैकी मावळ आणि हवेली या गावांमधील भूसंपादनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये मावळ तालुक्यातील सहा गावांसाठीच्या जमिनीचे दर अंतिम करण्यात आले आहेत.
मावळ मधील वडगाव, कातवी, वराळे, आंबी, आकुर्डी, माणोलीतर्फ चाकण या 6 गावातील ७३.६१ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार असून यासाठीचे दर अंतिम झाले आहेत. या संबंधित जमिनीसाठी 883 कोटी 55 लाख रुपयांचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे.
या सहा गावांपैकी तीन गावांमध्ये पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग प्रस्तावित असल्याने या गावांमधील जमिनीला अधिकचा दर मिळणार आहे. दरम्यान मुदतीत संमती पत्र देणाऱ्या शेतकऱ्यांना 25 टक्के अधिकचा मोबदला मिळणार आहे.