Pune News : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, ढगाळ हवामान, दुष्काळ अशा नानाविध संकटांमुळे शेती व्यवसाय तोट्याचा ठरू लागला आहे. यामुळे आता अनेक शेतकरी पुत्र शेती नको रे बाबा असं ओरड करू लागले आहेत. शेती ऐवजी आपण दुसरा एखादा व्यवसाय करू असा निर्धार आता नवयुवकांनी केला आहे.
एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे पुण्यात एक जर्मन दाम्पत्य शेती करत आहे. मूळचे जर्मनीचे जॉन मायकल आणि अंजी मायकल आपल्या पुण्यात सेंद्रिय शेती करत आहेत. खरे तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून नेहमीच राज्यातील इतर शेतकऱ्यांना दिशा दाखवण्याचे काम केले आहे.
आता याच पुण्याच्या मातीत जर्मनीच्या या दांपत्याने यशस्वी शेती करून इतर पर्यवेक्षण शेतकऱ्यांना दिशा दाखवण्याचे कार्य केले आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या कांबरे गावात हे दाम्पत्य गेल्या पाच वर्षांपासून आपल्या अनुभवाच्या जोरावर शेती व्यवसायात नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहेत.
या दांपत्याने शेतीचा व्यवसाय कशा तऱ्हेने फायदेशीर ठरू शकतो हे दाखवून दिले आहे.हे दाम्पत्य शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहे. खरे तर एका बहुराष्ट्रीय कंपनीत मायकल कामाला होते. दरम्यान ते कंपनीच्या कामासाठी भारतात आले होते. त्यावेळी मायकलने कांबरे गावातील शाळेत सामाजिक कार्य केले होते.
सामाजिक कार्याची आवड असलेले मायकल नोकरी मधून रिटायर झाल्यानंतर पुन्हा भारतात आले. त्यांनी आता गेल्या पाच वर्षांपासून कांबरे गावात सेंद्रिय शेती सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार 2013 मध्ये हे जोडपं सर्वप्रथम भारतात आलं. चार वर्षे ते प्रवासी भारतीय म्हणून भारतात राहिलेत. यानंतर त्यांनी 2018 मध्ये गुंतवणूकदार म्हणून भारतात आलेत.
येथे त्यांनी दोन भागीदारी कंपन्या स्थापित केल्या आहेत. शिवाय थोडी जमीन ही खरेदी केली. आता ते या जमिनीत शेती करत आहेत. पडीक, माळरान जमिनीवर त्यांनी शेती सुरू केली होती मात्र आजच्या घडीला हे पडीक माळरान अगदी नंदनवनसारखे फुलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी ते पूर्णपणे नैसर्गिक संसाधने वापरतात.
त्यांच्या या कामातून 30 स्थानिक महिलांना व पुरुषांना रोजगार देखील मिळाला आहे. या दांपत्याने सात एकर जमिनीवर तीनशे प्रकारची 40,000 झाडे लावलेली आहेत. फळझाडे, जंगलातील झाडे, पालेभाज्या, फुलांची झाडे अशा प्रकारची झाडे त्यांनी लावलेली आहेत. विशेष म्हणजे या झाडांच्या वाढीसाठी ते कंपोस्ट खताचा आणि शेणखताचा वापर करतात.
शेतीसाठी ते कोणत्याही रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर करत नाहीत. यामुळे त्यांच्या जमिनीची सुपीकता वाढत चालली आहे. या दांपत्याने येथील शेत जमिनीचा चांगल्या पद्धतीने विकास केला आहे. त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन केले आहे. मायकलने विकसित केलेल्या या शेतात तीन पाझर तलाव आहेत.
तीन तलावांमधून सर्वात खालच्या विहिरीत पाणी झिरपते आणि तेथून ते पुन्हा उंचावरील टाक्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे पाण्याचा थेंबही वाया जात नाही. शेतीला सिंचनासाठी फक्त सौरऊर्जेचा वापर केला जातो. ठिबक सिंचन करताना लाईटचा वापर न करता उताराचा वापर केला जातो. विशेष म्हणजे येथे काम करणाऱ्या कामगारांना वॉकी टॉकीज देण्यात आल्या आहेत.
यामुळे कामगारांकडून काम करून घेणे सोपे होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे त्यांची शेतीची कामे सोपी झाली आहेत. गावात नेटवर्क चा प्रॉब्लेम असल्याने त्यांनी वॉकी टॉकीज वापरण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे येथील कामगारांचा आरोग्य विमा देखील काढण्यात आला आहे.
एवढेच नाही तर कामगारांच्या मुलांचा बारावीपर्यंतचा शिक्षणाचा खर्च देखील या दांपत्याच्या माध्यमातून उचलला जात आहे. यामुळे खऱ्या अर्थाने मायकल यांना सामाजिक कार्याचे भान आहे हे अधोरेखित होते. निश्चितच जर्मनीच्या या दांपत्याने पुण्याच्या मातीत केलेली ही सेंद्रिय शेती आणि त्यांचे सामाजिक कार्य इतरांसाठी देखील प्रेरक ठरणार आहे यात शंकाच नाही.