Pune Nashik Highway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. परिणामी आता राज्यातील दळणवळण व्यवस्था आधीच्या तुलनेत मजबूत झाली आहे. अशातच आता पुणेकरांसाठी आणि नाशिक शहरातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात विकसित होत असलेला राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दरम्यानचा समृद्धी महामार्ग अंतिम टप्प्यात असतानाच एका नवीन महामार्गाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
खरे तर सध्या स्थितीला मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असलेल्या समृद्धी महामार्गाचा सहाशे किलोमीटर लांबीचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर एवढी असून उर्वरित 101 किलोमीटर लांबीचे काम देखील येत्या काही दिवसात पूर्ण होणार असून लवकरच हा मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच नासिक ते पुणे हा प्रवास गतिमान व्हावा यासाठी एक नवीन इंडस्ट्रियल हायवे तयार केला जाणार आहे. यामुळे या दोन्ही शहरात दरम्यानचा प्रवास जलद होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा मार्ग तयार होणार आहे. हा मार्ग एकूण 213 किलोमीटर लांबीचा राहणार असून या मार्गासाठी मोनार्च सर्व्हेअर अँड इंजिनीअरिंग कन्स्ल्टंट या कंपनीने आराखडा तयार करून दिला आहे.
दरम्यान याच आराखड्याला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे आता या प्रकल्पाच्या भूसंपादनाला लवकरच सुरुवात होणार अशी आशा व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ राज्यात 4217 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करणार आहे. यामध्ये पुणे ते नाशिक दरम्यानच्या इंडस्ट्रियल हायवेचा देखील समावेश राहणार आहे.
या प्रकल्पासाठी 20,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. हा मार्ग पुणे अहमदनगर आणि नासिक येथील राजगुरूनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर या महत्त्वाच्या शहरांना जोडणार आहे.
यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील उद्योग शिक्षण कृषी पर्यटन अशा विविध क्षेत्राला मोठी उभारी मिळणार आहे. या महामार्गादरम्यान भोसरी, रांजणगाव, राष्ट्रीय महामार्ग, शिर्डी येथे 37 किमी जोडररस्ता तयार होणार आहे. अशा परिस्थितीत, आता आपण या महामार्गाचा रोड मॅप थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असेल इंडस्ट्रियल हायवे
हा इंडस्ट्रियल हायवे किंवा औद्योगिक महामार्ग पुणे, अहमदनगर आणि नासिक हे तीन जिल्हे परस्परांना जोडणार आहे. हा मार्ग तीन टप्प्यात विभागण्यात आला आहे.
यात पुणे ते शिर्डी असा 135 किलोमीटर लांबीचा एक टप्पा, शिर्डी इंटरचेंज ते नाशिक-निफाड इंटरचेंज असा 60 किलोमीटरचा सुरत चेन्नई एक्सप्रेस वे चा दुसरा टप्पा आणि नासिक-निफाड इंटरचेंज ते नासिक असा 60 किलोमीटरचा तिसरा टप्पा राहणार आहे.
या मार्गातील तिसरा टप्पा हा नासिक-निफाड राज्य महामार्गाचा एक भाग राहणार आहे. दरम्यान हा महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर पुणे ते नाशिक हा पांच तासांचा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण होईल असा दावा तज्ञांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यामुळे निश्चितच या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास गतिमान होणार आहे यात शंकाच नाही.