Pune Mhada News : पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरंतर अलीकडे घरांच्या किमती खूपच वाढल्या आहेत. वाढत्या महागाईने बेजार झालेल्या नागरिकांना घर खरेदीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. घरांच्या वाढलेल्या किमती अनेकांच्या स्वप्नाच्या आड येत आहेत.
अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना घर खरेदीसाठी म्हाडाचा मोठा आधार मिळत आहे. म्हाडाची परवडणारे घरे खरेदीसाठी नेहमीच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दाखवला जातो. म्हाडाच्या घरांमुळे हजारो नागरिकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
दरम्यान म्हाडा पुणे मंडळाने नुकतीच 4 हजार 777 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. या लॉटरीसाठी आठ मार्च 2024 पासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि ही प्रक्रिया 8 एप्रिल 2024 पर्यंत सुरू राहणार होती.
मात्र नागरिकांच्या माध्यमातून या अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली गेली पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पुणे मंडळांने या लॉटरीला मुदतवाढ दिली असून आता 30 मे 2024 पर्यंत इच्छुक नागरिकांना या घरांसाठी अर्ज करता येणार आहे.
विशेष म्हणजे या लॉटरीमध्ये समाविष्ट असलेल्या घरांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. जेव्हा ही लॉटरी जाहीर झाली तेव्हा 4 हजार 777 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली मात्र आता या लॉटरीत 100 घरांची वाढ झाली असून सदनिकांची संख्या 4877 एवढी झाली आहे.
मात्र या घरांसाठी सोडत केव्हा जाहीर होणार ? हा मोठा प्रश्न नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मंडळाने जाहीर केलेल्या या सोडतीसाठी आचारसंहिता संपल्यानंतर सोडत काढली जाणार आहे.
चार जूनला लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट लागणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट लागला की लगेचच पुणे मंडळाच्या या घरांसाठी लॉटरी निघणार असा दावा होत आहे. म्हणजेच जून महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा अखेरीस पुणे मंडळाच्या या घरांसाठी लॉटरी काढली जाऊ शकते.
या लॉटरीत पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटासाठी सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या लॉटरीत म्हाडाच्या विविध योजनेतील १८, म्हाडाच्या प्रधानमंत्री आवास योजनेची ५९ घरे, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेच्या १४०६, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेच्या २४१६, पीपीपी तत्वावरील ९७८ अशा चार हजार ८७७ सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे.