Pune Metro News : पुणे शहरात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच पीएमआरडीए आणि महा मेट्रोच्या माध्यमातून मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध रस्ते प्रकल्प आणि रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.
रेल्वे प्रकल्पांमध्ये मेट्रोचे देखील अनेक प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे. शहरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रोचे जाळे तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. सध्या शहरातील दोन महत्त्वाच्या मार्गांवर मेट्रो सुरू आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. विशेष म्हणजे सिविल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यान सुद्धा लवकरचं मेट्रो धावणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी जलद होईल अशी आशा आहे.
अशातच आता स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित मेट्रोमार्गासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरे तर हा मेट्रो मार्ग महा मेट्रोच्या माध्यमातून तयार होणार आहे. महामेट्रोने या मेट्रो मार्गाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता.
मध्यंतरी या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तसेच राज्य शासनाने हा प्रस्ताव आता केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. दरम्यान केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेल्या या प्रस्तावाबाबत राजधानी दिल्लीत मोठा निर्णय झाला आहे.
तो म्हणजे केंद्रातील सार्वजनिक गुंतवणूक मंडळांनी या मेट्रो मार्गाच्या प्रस्तावाला तत्वता मंजुरी दिली आहे. गुंतवणूक मंडळापुढे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
या प्रस्तावाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने तत्वतः मंजुरी दिली आहे. यामुळे आता हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ देखील या प्रस्तावाला मंजुरी देईल अशी आशा आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. विशेष बाब म्हणजे महामेट्रोचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.त्यामुळे केंद्राच्या मंजुरीआधीच महामेट्रोने या मार्गासाठी रचना सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा काढल्या आहेत.
त्यामुळे केंद्राची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच या मार्गाचे काम सुरू होऊ शकणार आहे. हा प्रस्तावित करण्यात आलेला मेट्रो मार्ग संपूर्ण भुयारी राहणार आहे. हा एकूण 5.4 किलोमीटर लांबीचा मार्ग असेल आणि यामध्ये तीन मेट्रो स्टेशन विकसित होतील.
मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज ही तीन महत्त्वाचे स्थानके या मेट्रो मार्गावर राहणार आहेत. यासाठी 3,663 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या मेट्रोमार्गामुळे स्वारगेट ते कात्रज दरम्यानचा प्रवास गतिमान आणि सुरक्षित होईल अशी आशा आहे.