Pune Metro News : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे तयार केले जात आहे. खरे तर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी शासन अन प्रशासनाच्या माध्यमातून शहरात मेट्रोचे जाळे विणले जात आहे.
सध्या शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लीनिक या मार्गांवर मेट्रो सुरु आहे. या मेट्रो मार्गांवर एक ऑगस्ट 2023 ला सेवा सुरू झाली आहे. आधी शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे सेवा सुरू होती.
मात्र ऑगस्ट 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फुगेवाडी ते सिविल कोर्ट आणि गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक अशी मेट्रो सेवा सुरू झाली. यामुळे शहरातील नागरिकांचा प्रवास जलद आणि सुरक्षित झाला आहे.
मेट्रो सेवा सुरू झाल्यापासून पुणेकरांनी या सेवेला विशेष प्रतिसाद देखील दाखवला आहे. मात्र असे असले तरी पुणेकरांच्या माध्यमातून या मेट्रोचे विस्तारित मार्ग केव्हा सुरू होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
खरे तर रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गावरील सेवा 19 फेब्रुवारी पासून म्हणजेच आजपासून सुरू होणार होती. या मेट्रो मार्गाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार असे बोलले जात होते.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा लांबणीवर पडला असल्याने या मेट्रो मार्गाचे उद्घाटन देखील लांबणार हे स्पष्ट होत आहे. यामुळे रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गांवर केव्हा मेट्रो धावणार हा सवाल अजूनही कायमच आहे.
रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीचा मार्ग तयार
रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी पर्यंतचा मेट्रो मार्ग पूर्णपणे बांधून तयार झाला आहे. या मार्गाचे फक्त उद्घाटन बाकी आहे असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.
कारण की या मार्गाची अंतिम तपासणी केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी पूर्ण केली आहे. तपासणी दरम्यान सुरक्षा आयुक्तांना या मार्गात काही त्रुटी आढळल्या होत्या.
या त्रुटी त्यांनी दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, या त्रुटी दूर करून महामेट्रोने त्याचा सुधारित अहवाल आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
मात्र आयुक्तांनी याला अजून मंजुरी दिलेली नाही. तथापि, लवकरच या अहवालाला मंजुरी मिळणार आहे. यामुळे आता हा मेट्रो मार्ग केव्हा सुरू होणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.