Pune Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान, वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी गारपिट देखील झाली आहे. यामुळे कमाल तापमानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सूरु आहे. पण काही ठिकाणी तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.
राजधानी मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात उष्णतेची लाट पसरली आहे. विशेष म्हणजे आज देखील हवामान खात्याने मुंबई आणि कोकणात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज दिला आहे.
मात्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही मोजक्या जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेष बाब अशी की, आज विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होणार असा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज अर्थातच 25 एप्रिलला राज्यातील मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, जळगाव, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, विदर्भ विभागातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे, आगामी चार ते पाच दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता कायम राहणार आहे. पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुण्यातही आगामी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्रार वाऱ्याची स्थिती आहे यामुळे गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा ढगाळ हवामान होत आहे तर काही ठिकाणी वादळी पाऊस सुरू आहे.
दरम्यान हे वादळी पावसाचे सत्र आगामी काही दिवस असेच सुरू राहील आणि त्यानंतर पुन्हा एकदा हवामान पूर्व पदावर येईल असे म्हटले जात आहे. पुण्यातही पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. वादळी पावसाची शक्यता आहे यामुळे पशुधनाची देखील काळजी घेण्याचे आवाहन जाणकार लोकांनी यावेळी केले आहे.