Pune Dam News : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जिल्ह्यातील एका मोठ्या धरणातून तब्बल 28 लाख टन गाळ काढला गेला आहे. यामुळे धरणाच्या पाण्याची क्षमता वाढणार आहे. परिणामी या धरण परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता. हे धरण बांधले गेले तेव्हापासून या धरणातील गाळ काढला नव्हता.
यामुळे या धरणातील गाळ काढला गेला पाहिजे अशी मागणी होती. हे धरण 1879 मध्ये बांधले गेले. जेव्हा हे धरण बांधले तेव्हा या धरणाची क्षमता 3.75 टीएमसी एवढी होती. मात्र काळाच्या ओघात या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचत गेला.
परिणामी या धरणाची क्षमता ही 1.75 टीएमसी वर आले. म्हणजे धरणाची क्षमता निम्म्याहून अधिक कमी झाली. हेच कारण होते की या धरणातील गाळ काढला गेला पाहिजे अशी मागणी जोर धरत होती.
दरम्यान 2013 पासून खडकवासला धरणातून गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. सैन्यातून रिटायर्ड झालेले कर्नल सुरेश पाटील यांच्या पुढाकारातून गाळ काढायला सुरुवात झाली.
ग्रीन थंब या संस्थेची पाटील यांनी स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून या धरणातून गाळ काढला जात आहे. दरवर्षी ही संस्था या धरणातून हजारो टन गाळ काढत आहे. विशेष म्हणजे हा गाळ आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना दिला जात आहे.
या गाळामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात वाढ झाली आहे. पाटील यांनी सैन्यातून निवृत्ती घेतल्यानंतर पर्यावरणासाठी काम सुरू केले. त्यांनी खडकवासला धरण गाळमुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी त्यांनी सुरुवातीला त्यांचे घर सुद्धा विकले.
दरम्यान पाटील यांच्या पुढाकाराने खडकवासला धरणातून आत्तापर्यंत 28 लाख टन काढला गेला असून यामुळे धरणाची क्षमता 0.20 टीएमसीने वाढली आहे.
यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची आशा व्यक्त आहे आहे.