Pune News : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात आरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी सकल धनगर समाजाने खंडाळा येथील शिवाजी चौकापासून मोर्चा काढत पुणे-बंगळुरू आशियाई महामार्ग तब्बल पाच तास रोखला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळास भेट देण्याचे दूरध्वनीवरून जाहीर केल्यानंतर वाहतूक धिम्या गतीने सुरू करण्यात आली.
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गणेश केसकर हे गेल्या सोळा दिवसांपासून लोणंद येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. यावेळी धनगर समाजाची एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित व्हावी.
तशी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे त्वरित शिफारस करावी व एस.टी.ची सर्टिफिकेट त्वरित मिळावीत. मेंढपाळांवरील होणाऱ्या हल्ल्यांबाबत शासनाने मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळाला पाहिजे, धनगर समाजातील मेंढपाळांना चरायसाठी वने आरक्षित करून पास उपलब्ध करून देण्यात यावा आदी मागण्या आहेत.
दरम्यान, धनगर समाजाने काढलेल्या मोर्चात बकरी व पारंपरिक गजी नृत्याचा समावेश केला होता. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पारंपरिक नृत्यावर ठेका धरला असताना संघर्षयोद्धा गणेश केसकर यांच्या वडिलांनी व भावाने गळ्यात ढोल बांधत आंदोलनकर्त्यांना ताल दिला.
मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यांनी घरून आणलेली चटणी भाकर खात आपल्या उपोषणकर्त्या भावाच्या पाठीशी ठाम असल्याचे दाखवून दिले.
दरम्यान, पाच तासाहून जास्त वेळ बसून राहावे लागल्याने त्रस्त झालेल्या प्रवाशांनी आंदोलकांशी हुज्जत घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आम्ही घरे, गाड्या जाळणारे नाही धनगर आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी न झाल्यास मुंबईला जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. आम्ही घरे, गाड्या जाळणारे नाही,
तर कायदा मानणारे आहोत. राज्य शासनाने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सांगून धनगड नाही तर धनगर आहे, असे सांगून प्रमाणपत्र देण्यास सांगावे. तर राज्य शासनाने जीआर काढून तत्काळ अंमलबजावणी करावी. धनगरांना ज्या लोकप्रतिनिधींनी पाठिंबा नाही त्यांना पुन्हा विधानसभा नसणार आहे. –आ. गोपीचंद पडळकर