Pune Airport New Terminal : पुण्यातील विमान प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून नव्या टर्मिनलच्या उद्घाटनाची वाट पाहत आहेत. मात्र पुण्यातील विमानतळाचे नवीन टर्मिनल बांधून तयार असले तरी देखील उद्घाटनाअभावी लालफितीत अडकले आहे.
खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्यातील सुरत येथील विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे 30 डिसेंबर 2023 रोजी अर्थातच उद्या नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातील राज्यातील अयोध्या येथील नवीन विमानतळाचे उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे पुणेकर अखेर पुण्यातील विमानतळाचे नवीन टर्मिनल केव्हा सुरू होणार आहे हा सवाल उपस्थित करत आहेत.
खरे तर या नव्या टर्मिनल साठी 500 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही अजूनही विमान प्रवाशांना जुन्या टर्मिनल वरूनच जावे लागत आहे. जुन्या टर्मिनल वर असलेल्या गर्दीतच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
खरे तर पुण्याच्या नव्या टर्मिनलचे काम सप्टेंबर 2023 मध्ये बऱ्यापैकी पूर्ण झाले होते. यामुळे पुण्यातील विमानतळाचे हे नवीन टर्मिनल ऑक्टोबर 2023 मध्ये सर्वसामान्यांसाठी सुरू होणारं असा आशावाद व्यक्त केला जात होता.
पण ऑक्टोबर महिन्यातही या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. थोडेफार काम बाकीच होते. ऑक्टोबर सोडा पण नोव्हेंबर महिनाही उलटला आहे आणि आता डिसेंबर महिनाही उलटत चालला आहे.
तरीदेखील पुण्यातील विमानतळाचे नवीन टर्मिनलचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. अजूनही या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील काम बाकी असल्याचा दावा विमानतळ प्रशासनाच्या माध्यमातून केला जात आहे. परंतु वस्तुस्थिती काही औरच आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये या नव्या टर्मिनलचे काम पूर्ण झाले असून फक्त उद्घाटनासाठी संबंधिताची वेळ मिळत नसल्याने याचा उद्घाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला जात असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत पुण्यातील या नव्या टर्मिनलचा लाभ पुणेकरांना नवीन वर्षातच मिळणार आहे.
कसे आहे नवीन टर्मिनल ?
या नव्या टर्मिनल चे क्षेत्रफळ 60,000 चौरस फूट एवढे आहे. या नव्या टर्मिनलच्या प्रकल्पासाठी 500 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच या प्रकल्पासाठी जवळपास 525 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या नव्या टर्मिनलवरून एक कोटी वीस लाख प्रवासी वर्षाकाठी प्रवास करू शकतील असा दावा होत आहे. सध्या स्थितीला मात्र हे नवीन टर्मिनल उद्घाटन अभावी लालफितीत अडकलेले आहे.