Maharashtra News
Maharashtra News

जिल्ह्यात सर्वांत जास्त शाखा आणि मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा करणारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून प्रायोगिक तत्त्वावर बळीराजा मुदती कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत आता औषधोपचार खर्च, विवाह, यात्रा, सहल, किरकोळ घराची दुरुस्तीबरोबर आता दुचाकी आणि चारचाकी वाहनखरेदीसाठी कर्ज देणार आहे.

या बळीराजा मुदती कर्ज योजनेंतर्गत साडेदहा टक्के व्याज दर निश्चित करण्यात आला असून, पाच वर्षांकरिता हे कर्ज असणार आहे,

अशी माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, उपसरव्यवस्थापक संजय शितोळे, सहायक सरव्यवस्थापक समीर रजपूत यांनी दिली आहे.

पीडीसीसी बँकेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी मुळशी तालुक्यातील कोळवण खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी बळीराजा मुदती कर्ज योजना सुरू करण्यात आली होती.

त्याचबरोबर भातलावणीसाठीचे बियाणेही कमी दरात उपलब्ध करून दिले होते. या योजनेचा चांगला लाभ हा या भागातील शेतकऱ्यांना झाला होता.

त्यानुसार ही योजना आता पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत लागू केली जाणार आहे. या बळीराजा योजनेत यात्रा कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात सुरू होणाऱ्या यात्रा हंगामात शेतकरी याचा किती लाभ घेणार, हे पाहावे लागणार आहे.

खासगी सावकारांकडून किंवा नागरी बँक, नागरी पतसंस्थांकडून होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी ही बळीराजा मुदती कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.

याशिवाय, त्यात प्रति एकरी सात लाख रुपयांपर्यंत कर्जपुरवठा केला जाणार आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेशी संलग्न असलेल्या ११९२ विविध कार्यकारी सोसायट्यांचे संगणकीकरण केले जात आहे. त्याकरिता खेड,

शिरूर, दौंड आणि इंदापूर या चार तालुक्यांमध्ये संगणकीकरण क्लस्टर्स सुरू करण्यात आले आहेत.

तर, बिगरशेती कर्जपुरवठ्यात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार ही मर्यादा आता ३० लाखांवरून ७५ लाखांपर्यंत करण्यात आली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *